
हिंदुस्थानात 12 आणि 13 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते दिल्लीत दाखल होणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण द्विपक्षीय बैठक पार पडणार आहे. तत्पूर्वी चीनने शेजारधर्म पाळण्याचे आणि मतभेद योग्य प्रकारे सोडवण्यावर भर दिला आहे. चीन हिंदुस्थानसोबत मिळून काम करेल आणि दोन्ही देशांतील मतभेद योग्य रीतीने सोडवेल, असा विश्वास हिंदुस्थानातील चीनचे राजदूत शू फेइहोंग यांनी व्यक्त केला आहे.
शुक्रवारी रात्री एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये शू फेइहोंग यांनी म्हटले की, चीन आणि हिंदुस्थान हे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील द्विपक्षीय बैठकीचे नियोजन करत आहेत. शी जिनपिंग हे जवळपास सात वर्षांनंतर हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदींच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून ते नवी दिल्लीत आयोजित 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी शनिवारी बीजिंगहून रवाना झाले आहेत. पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यातील ही बहुप्रतिक्षित बैठक आज संध्याकाळी 5.45 वाजता नियोजित आहे.
कझान आणि तियानजिन येथील यशस्वी भेटींनंतर दोन्ही जागतिक नेत्यांची ही सलग तिसरी भेट असेल, असे शू फेइहोंग यांनी म्हटले. चीन परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी आणि सर्व प्रलंबित मुद्दे सोडवण्यासाठी हिंदुस्थानसोबत सर्व स्तरांवर काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दोन्ही नेत्यांच्या धोरणात्मक निर्देशांची अंमलबजावणी करणे, दीर्घकालीन दृष्टिकोनातून द्विपक्षीय संबंध हाताळणे, संवाद वाढवणे आणि मतभेद योग्य प्रकारे सोडवणे यासाठी चीन कटिबद्ध आहे. एक चांगला शेजारी आणि एकमेकांच्या विकासात मदत करणारा भागीदार म्हणून मैत्री पुढे नेण्यासाठी चीन हिंदुस्थानसोबत काम करेल, असेही त्यांनी एक्स पोस्टमध्ये नमूद केले.
गलवान संघर्षानंतर पहिलाच दौरा
2020 मध्ये गलवान खोऱ्यात हिंदुस्थान आणि चीनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर शी जिनपिंग यांचा हा पहिलाच हिंदुस्थान दौरा आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांतील संबंध कमालीचे ताणले गेले होते. मात्र, अलीकडच्या काळात मुत्सद्दी चर्चेच्या माध्यमातून संबंधांमध्ये सुधारणा झाली असून, कझान आणि तियानजिन येथे पंतप्रधान मोदी आणि जिनपिंग यांच्यात झालेल्या बैठकांमुळे संवादाचे नवे मार्ग खुले झाले आहेत.




























































