
33 वर्षांपूर्वीच्या बॉम्बस्फोटातील तुकडा शरीरात, राहिला असल्याचा प्रकार हिंदुजा रुग्णालयात उघडकीस आला. श्री सुधीर तुकाराम मोहिते वय ५७ यांना ब्रेन स्ट्रोक दरम्यान एम आर आय तपासणी करताना मशीन मध्ये आवाज आल्याने हा प्रकार उघडकीस आला. सदरचे रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील चिखली गावातील आहेत.
तब्बल ३३ वर्षे त्यांच्या शरीरात हा तुकडा असल्याची कोणतीही कल्पना नव्हती आणि त्यांना त्याचा त्रासही जाणवला नाही.मात्र, सध्याच्या उपचारादरम्यान एम आर आय तपासणीच्या वेळी हा धातूचा तुकडा असल्याचे समोर आले. सदरचा तुकडा आर डी एक्स मिश्रीत असल्याचे मानले जात असून त्यांना झालेल्या ब्रेन स्ट्रोकवरील प्राथमिक उपचार पूर्ण झाल्यानंतर दि. ११ सप्टेंबर रोजी हिंदुजा रुग्णालयाचे डॉ कुमार ऋषी यांनी हा तुकडा शरीरातून काढला. सध्या हा तुकडा पुढील तपासणी व वैज्ञानिक संशोधनासाठी पाठविण्यात येणार असून, तब्बल ३३ वर्षांपूर्वी झालेल्या त्या भीषण बॉम्बस्फोटाची एक निशाणी पुन्हा समोर आली आहे.
सुधीर तुकाराम मोहिते यांना सौम्य स्वरूपाचा ब्रेन स्ट्रोक आल्याने मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना एम आर आय तपासणीसाठी पाठविले. मात्र, एम आर आय मशीनमध्ये तपासणी सुरू असताना अचानक आवाज आल्याने त्यांना तातडीने मशीनमधून बाहेर काढण्यात आले.एम आर आय मशीनमध्ये आवाज का झाला. या तपासणी दरम्यान त्यांच्या ओठाच्या वरच्या भागात असलेल्या एका गाठीमुळे एम आर आय प्रक्रियेत अडचण निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. पुढील तपासणीत ही साधी गाठ नसून तब्बल ३३ वर्षांपूर्वीच्या मुंबईतील बॉम्बस्फोटातील धातूचा तुकडा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला
दि. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोटांच्या मालिकेतील एका स्फोटाच्या वेळी सुधीर मोहिते हे वरळी परिसरातील पासपोर्ट कार्यालयासमोरील मॉडर्न हॉटेलजवळ, १६५ व १७२ बस क्रमांकाच्या बसथांब्याच्या परिसरात असलेल्या १७२ क्रमांकाच्या बसमध्ये प्रवास करत होते. त्या वेळी झालेल्या स्फोटात अनेक जण मृत्युमुखी पडले, तर असंख्य नागरिक जखमी झाले.या भीषण घटनेत मोहिते यांच्या गालाच्या भागात जखम झाली होती. त्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात नेऊन उपचार व ड्रेसिंग करून घरी आणले. मृत्यूच्या छायेतून बचावलेले मोहिते आज ३३ वर्षांनंतरही त्या घटनेची जखम शरीरात घेऊन जगत होते, याचा उलगडा एका एम आर आय तपासणीमुळे झाला, ही घटना अत्यंत दुर्मिळ आणि थरारक आहे.
























































