मुंबई लोकलचा खोळंबा; कल्याणमध्ये ओव्हरहेड वायर बिघाडामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवासी पावसात ताटकळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सवाच्या आगमनाला अवघ्या काही तासांचा अवधी उरला असतानाच, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा नाहक मनस्तापाचा सामना करावा लागला आहे. रविवारी दुपारी कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली. ऐन खरेदीच्या दिवशी लोकल सेवा ठप्प झाल्याने हजारो गणेशभक्त आणि चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी कल्याण रेल्वे स्थानक परिसरामध्ये ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. या तांत्रिक बिघाडामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वरील लोकल वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक लोकल फेऱ्या रेल्वे रुळावरच वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात आल्या. सुमारे ४५ मिनिटांहून अधिक काळ गाड्या एकाच जागी अडकून पडल्यामुळे स्थानकांवर आणि रुळांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी जमली होती.

प्रवाशांचा भरपावसात रुळांवरून प्रवास

गाड्या तासभर जागेवरच थांबल्याने आणि स्थानकांवर घोषणा न झाल्याने संतप्त आणि त्रस्त प्रवाशांनी लोकलधून खाली उतरत रेल्वे रुळावरूनच पायी चालत प्रवास करणे पसंत केले. त्यातच बाहेर पाऊस सुरू असल्याने नागरिकांचे अतोनात हाल झाले. लहान मुले, महिला आणि वृद्ध प्रवाशांना या ढिसाळ कारभाराचा मोठा फटका बसला. काही फेऱ्या संथ मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकाचे पुरते तीन तेरा वाजले.

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला प्रवाशांमध्ये संताप

सोमवारपासून बाप्पाचे आगमन होत असल्यामुळे रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तुफान गर्दी पाहायला मिळत होती. मात्र रेल्वेच्या या तांत्रिक बिघाडामुळे ऐन सणाच्या तोंडावर प्रवाशांचा हिरमोड झाला. मध्य रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. सण-सुदीच्या दिवशी रेल्वे प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभाराबद्दल प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.