पंतप्रधान मोदींनी चीनसमोर शरणागती पत्करली आहे का, यावरून जनता चिंतेत – नाना पटोले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात सुरू असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस नेते नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “पंतप्रधान मोदींनी चीनसमोर शरणागती पत्करली आहे का, असा प्रश्न आता देशातील जनतेला पडला असून जनता प्रचंड चिंतेत आहे,” असा घणाघाती आरोप पटोले यांनी केला आहे. देशात एवढी मोठी परिषद होत असताना, देशाच्या सीमा सुरक्षेचा मुद्दा काँग्रेसने ऐरणीवर आणला आहे.

अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्ये चीनकडून सातत्याने हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरी केली जात आहे, याकडे लक्ष वेधत पटोले यांनी केंद्र सरकारच्या बोटचेप्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, चीन हिंदुस्थानची जमीन बळकावत असताना आणि आपल्या सीमा असुरक्षित असताना पंतप्रधान मोदी मात्र यावर मूग गिळून गप्प आहेत. ब्रिक्स परिषदेच्या माध्यमातून चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि इतर नेते उपस्थित असताना, पंतप्रधान मोदी या घुसखोरीचा मुद्दा त्यांच्यासमोर ठामपणे उपस्थित करून चीनला जाब विचारणार का, असा सवाल त्यांनी केला आहे. देशाची सुरक्षा धोक्यात असताना केवळ जागतिक मंचावर चमकोगिरी करून चालणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

याचबरोबर नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही निशाणा साधला. देशाच्या सीमांवर चीनकडून एवढे मोठे अतिक्रमण होत असताना नेहमी राष्ट्रवादाच्या गप्पा मारणारे मोहन भागवत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गप्प का आहे, असा सवाल त्यांनी विचारला. सीमा सुरक्षा आणि चीनच्या आक्रमक भूमिकेवर संघाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान त्यांनी दिले.