
एका चेक बाऊन्स प्रकरणात बॉलीवुड अभिनेता राजपाल यादव याला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा आहे. मात्र सुनावणी दरम्यान न्यायालयाने राजपाल यादवला कडक शब्दांत फटकारले आहे. तुम्ही चित्रपटात खूप छान अभिनय करता, परंतु इथे अभिनय करण्याचा प्रयत्न करू नका, अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
न्यायालयाने राजपाल यादवला 2 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे. न्यायालयाने दोन निर्देशही जारी केले आहेत. पैसे जमा करण्याची ही अभिनेत्याची शेवटची संधी आहे. यानंतर कोणतीही सूट दिली जाणार नाही, असेही न्यायालयाने पुढे स्पष्ट केले. राजपाल यादवला आपला पासपोर्टही तात्काळ जमा करावा लागेल, जेणेकरून तो न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ शकणार नाही, असे निर्देश न्यायालयाने दिले.
प्रकरण काय?
मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित हे प्रकरण आहे. राजपाल यादव आणि त्याची पत्नी राधा यादव यांनी चित्रपट निर्मितीसंदर्भात मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडसोबत व्यवहार केले होते, ज्याचे चेक बाऊन्स झाले होते.
दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी राजपाल यादव यांना दोषी ठरवून प्रत्येक आरोपासाठी तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालयाच्या या शिक्षेला आव्हान देत राजपाल यादव आणि त्यांच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.



























































