
हर्णे येथे मृतावस्थेत खवल्या मांजर आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात एका जागृत नागरिकांने वन विभागाला कळवले. खवल्या मांजर आढळून आल्याची माहिती मिळताच वन विभाग अधिकारी प्रभू सबाणे यांनी घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई पूर्ण केली.
दापोली तालुक्यातील हर्णे येथील समुद्रकिनारी खवल्या मांजर हे समुद्रकिनारी मृत अवस्थेत पडल असल्याबाबत हर्णे गावचे ग्रामस्थ फहाज जमादार यांनी दापोली वन विभागाला कळविले असता वन विभागाचे अधिकारी प्रभू साबणे यांनी तात्काळ जागेवर जाऊन पाहणी केली. पाहणी केली असता सदर मृत अवस्थेत असलेले खवले मांजर ताब्यात घेऊन पाहिले. तसेच त्याच्या पूर्ण शरीराचे अवयव सुव्यवस्थित असल्याची त्यांची खात्री झाली. मात्र सदरचे खवल्या मांजर हे उंच टेकडीवरून समुद्राच्या पाण्यामध्ये पडल्यामुळे मृत्यू झाला असावा, असा त्यांनी अंदाज व्यक्त केला. सदर खवल्या मांजराला वन विभागाचे अधिकारी प्रभू साबणे यांनी ताब्यात घेऊन पुढील सोपस्कार त्यांनी वरीष्ठाच्या मार्गदर्शनाखाली पार पाडले


























































