पश्चिम विदर्भातील पिके पावसाअभावी करपली, यवतमाळमध्ये २३ सप्टेंबरला शिवसेनेचा धडक मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम विदर्भात पावसाने तब्बल ५० दिवसांची दडी मारल्याने खरीप पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वाया गेला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट ५० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विदर्भातील पाचही जिल्ह्यांत धडक मोर्चे काढण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती आमदार नितीन देशमुख यांनी यवतमाळ येथील विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार संजय देरकर, राजेंद्र गायकवाड, प्रवीण शिंदे, संजय निखाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सोयाबीन, कापूस पिकांना फटका

पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक भागांत पिके करपली असून उत्पादनात मोठी घट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना एकरी १० ते २० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती, त्यांच्या हाती अत्यल्प उत्पादन येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने कोणत्याही जाचक अटी-शर्ती न लावता शेतकऱ्यांना तत्काळ सरसकट ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार देशमुख यांनी केली.

पीकविम्याचे चारही ‘ट्रिगर’ सुरू करण्याची मागणी

पीकविमा योजनेतील रद्द केलेले चारही ‘ट्रिगर’ पुन्हा सुरू करावेत, जनावरांसाठी तातडीने चारा डेपो सुरू करावेत आणि कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा करावा, अशा मागण्याही शिवसेनेने केल्या आहेत.

पाच जिल्ह्यांत आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाशिम येथे २१ सप्टेंबर, अकोला येथे २२ सप्टेंबर, यवतमाळ येथे २३ सप्टेंबर, अमरावती येथे २८ सप्टेंबर, तर बुलढाणा जिल्ह्यात २९ आणि ३० सप्टेंबर रोजी मोर्चे काढण्यात येणार आहेत.

यवतमाळमधील २३ सप्टेंबरच्या मोर्चाच्या तयारीसाठी जिल्ह्यातील १०० हून अधिक गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.