
सरकारी जमिनीवरील कथित अतिक्रमणाबाबतच्या याचिकेसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयात खोटा अहवाल सादर करणे एका महसूल अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. या महसूल अधिकाऱ्यावर गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा श्रीकांत का पुरवा-सराई सागर भागातील महसूल लेखापाल राम सिंह यांच्याविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आलोक कुमार यांनी सांगितले.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, सदर तहसील अंतर्गत येणाऱ्या गावातील रहिवासी अशोक मिश्रा यांनी सरकारी जमिनीवर बेकायदेशीर ताबा असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने या प्रकरणाबाबत जिल्हा प्रशासनाकडून अहवाल मागवला होता.
न्यायालयाच्या निर्देशानुसार, राम सिंह यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले होते. त्यांचा अहवाल 13 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात पाठवण्यात आला. न्यायालयाने या अहवालाबाबत नाराजी व्यक्त केली आणि नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, प्रशासनाने केलेल्या चौकशीत, सिंह यांनी सादर केलेला अहवाल खोटा असल्याचे आढळून आले, असे अधिकाऱ्याने सांगितले.
नायब तहसीलदार चंदन लाल राणा यांच्या तक्रारीवरून, भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांतर्गत लेखपालावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे पोलिसांनी सांगितले.

























































