
छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यातील झीराम व्हॅली हल्ला प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयाने सर्व 10 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या हल्ल्यात 29 जणांचा मृत्यू झाला होता. जगदलपूर येथील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयात विशेष न्यायाधीश अभय सिंह राजपूत यांनी दोषी असल्याचा निकाल दिला. न्यायाधीशांनी दोन महिलांसह 10 आरोपींना दोषी ठरवत न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली, असे बचाव पक्षाचे वकील अरविंद चौधरी यांनी सांगितले.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, खटल्यादरम्यान 101 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. शिक्षा सुनावलेल्या 10 दोषींमध्ये प्रमिला मोडियम, चैतू लेकम उर्फ मुन्ना, सुमिता उर्फ पुनेम मोडियम, मुक्का मांडवी, कोसा कवासी उर्फ कोसाराम, आयता मार्कम, मदकामी देवा, जोगा मदकामी, बंजामी सन्ना उर्फ चामरू आणि महादेव नाग यांचा समावेश आहे. या प्रकरणातील 11 व्या आरोपीचा खटल्याच्या सुनावणीदरम्यान मृत्यू झाला.
25 मे 2013 रोजी नक्षलवाद्यांनी बस्तर जिल्ह्यातील दरभा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झीराम खोऱ्यात एका राष्ट्रीय महामार्गावर काँग्रेस पक्षाच्या परिवर्तन रॅलीवर हा हल्ला केला होता. हा हल्ला सर्वात प्राणघातक हल्ल्यांपैकी एक होता. या हल्ल्यात काँग्रेस नेते, नागरिक आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह एकूण 29 जण ठार झाले आणि 30 हून अधिक जण जखमी झाले.
या हल्ल्यात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नंद कुमार पटेल आणि त्यांचे पुत्र दिनेश, विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते महेंद्र कर्मा, माजी केंद्रीय मंत्री विद्या चरण शुक्ला आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार उदय मुदलियार ठार झाले होते.
























































