हिंदुस्थानवर १०० टक्के टॅरिफची टांगती तलवार! खरगे यांचा मोदी सरकारवर घणाघात; म्हणाले, सरकार अमेरिकेसमोर गुडघे टेकत आहे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेकडून हिंदुस्थानी वस्तूंवर १०० टक्के टॅरिफ लागण्याच्या शक्यतेवरून आणि यूपीआय व्यवहारांवर नव्याने लागू करण्यात आलेल्या एमडीआर शुल्कावरून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “मोदी सरकारचे परराष्ट्र आणि व्यापार धोरण पूर्णपणे अपयशी ठरले असून, सरकार अमेरिकेच्या दबावाखाली गुडघे टेकत आहे,” असा घणाघात खरगे यांनी केला.

अमेरिकेचा १०० टक्के टॅरिफचा धोका

अमेरिकेच्या संसदेत बुधवारी एका विधेयकावर अंतिम मतदान होणार आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास रशियाकडून तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या हिंदुस्थानसह अनेक देशांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याचा अधिकार राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिळेल. यावरून मल्लिकार्जुन खरगे यांनी X वर पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

ते म्हणाले, “पंतप्रधान मोदीजी, तुमचे प्रिय मित्र अबकी बार ट्रम्प सरकार आदेश देतात आणि तुम्ही त्यांच्यासमोर गुडघे टेकता. पण याचे परिणाम १४० कोटी हिंदुस्थानींना भोगावे लागतात.”

खरगे यांनी पुढे म्हणाले की, “आधी २५ टक्के, मग ५० टक्के आणि आता १०० टक्के टॅरिफचा धोका आहे. फार्मास्युटिकल्स, कापड उद्योग, अभियांत्रिकी वस्तू, रसायने, ऑटो पार्ट्स, रत्ने-दागिने, आणि तंत्रज्ञान क्षेत्राला याचा मोठा फटका बसेल. याशिवाय मोदी सरकारने अशा एका व्यापार चौकटीवर संमती दिली आहे, ज्यामुळे आगामी ५ वर्षांत ५०० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तू खरेदी करण्याची सक्ती होणार आहे, जे आपल्या शेतकऱ्यांच्या हितावर पाणी फिरवणारे आहे.”