
उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये नात्याला काळीमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी एक भयानक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. आपल्या प्रियकराला दुसऱ्या तरुणीसोबत फिरताना पाहिल्यानंतर संतापलेल्या प्रेयसीने त्याला जाब विचारला. या वादानंतर प्रियकराने तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात तिला थेट कारने धडक दिली आणि तिला चक्क कारच्या बोनेटवरून फरफटत नेले. या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना लखनौच्या गोमती नगर परिसरातील जनेश्वर मिश्र पार्कजवळ घडली. पीडित तरुणी अनामिका बुधवारी सकाळी तिथे चहा पिण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिचा प्रियकर शाहनवाज हा एका दुसऱ्या तरुणीसोबत तिथे आला. त्याला दुसऱ्या तरुणीसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर अनामिकाने त्याला थांबवून जाब विचारण्यास सुरुवात केली.
पाहता-पाहता रस्त्यावरील त्यांच्यातील वाद खूप वाढला. त्यानंतर शाहनवाजने कारमध्ये बसून तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला थांबवण्यासाठी अनामिका थेट कारच्या समोर उभी राहिली. मात्र शाहनवाजने कार न थांबवता थेट तिच्या अंगावर घातली. अनामिका जीव वाचवण्यासाठी कारच्या बोनेटला लटकून राहिली. ती जोरजोरात ओरडत होती, तरीही शाहनवाजने कार थांबवली नाही. काही अंतर पुढे गेल्यानंतर अनामिका बोनेटवरून खाली पडली आणि जखमी झाली. तिला खाली पाडल्यानंतरही शाहनवाज न थांबता कार घेऊन तिथून पसार झाला.
एनडीटिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अनामिका आणि शाहनवाज हे दोघे आधीपासून एकमेकांना ओळखत होते. शाहनवाजने स्वतःची खरी ओळख लपवून तिला प्रेमात पाडल्याचा आरोप या तरुणीने केला आहे. जेव्हा तिला त्याचे खरे रूप समजले आणि त्यातच तो दुसऱ्या तरुणीसोबत फिरताना दिसला, तेव्हा संतापलेल्या अनामिकाने त्याला जाब विचारला, ज्यातून हा भयानक प्रकार घडला.
अपघातानंतर जखमी झालेल्या अनामिकाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिने दिलेल्या तक्रारीच्या आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवली. पोलिसांनी कारवाई करत आरोपी शाहनवाजला अटक केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



























































