
ऐन सणासुदीमध्ये ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसने सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंग शुक्लामध्ये तब्बल 67 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बीआयएसने हॉलमार्किंग शुल्कात 30 रुपयांची वाढ केली असून आता प्रति दागिना 75 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दागिन्यांवरील शुक्ल 35 रुपयांवर कायम ठेवण्यात आले आहे. हे नवीन तर तात्काळ लागू करण्यात आले आहेत.
बीआयएसने ‘बीआयएस (हॉलमार्किंग) दुरुस्ती नियम, 2026 अन्वये 14 सप्टेंबर 2026 रोजी यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नव्या नियमांनुसार सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्याला प्रत्येक दागिनेमागे 75 रुपये हॉलमार्किंग शुक्ल द्यावे लागेल. तर चांदीचे हॉलमार्किंग शुक्ल 35 रुपये एवढे कायम ठेवण्यात आले आहे. पीटीआयने याबाबत वृत्त दिले आहे.
STORY | BIS raises gold hallmarking fee to Rs 75 from Rs 45 ahead of festive season
The Bureau of Indian Standards has revised hallmarking charges for gold and silver articles, raising the fee for gold to Rs 75 from Rs 45, while retaining the charge for silver at Rs 35, with… pic.twitter.com/rAsHHrsR5g
— Press Trust of India (@PTI_News) September 16, 2026
हॉलमार्किंग म्हणजे काय?
हॉलमार्किंग ही सोन्याच्या शुद्धतेची सरकारी खात्री असते. बीआयएस प्रमाणित दागिन्यांवर तीन प्रमुख चिन्हे असतात. यात बीआयएसचा लोगो, सोन्याची कॅरेटनुसार शुद्धता आणि 6 अंकी अक्षरी-संख्यात्मक एचयूआयडी युनिक आयडी क्रमांक.
सुवर्णकार संघटनेचा तीव्र विरोध
बीआयएसच्या या निर्णयावर ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलने तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारने या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार करावा आणि जुनेच दर लागू ठेवावेत, अशी मागणी केली आहे. हॉलमार्किंगमुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो, त्यामुळे आम्ही नेहमीच या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. परंतु, अनिवार्य असलेल्या या नियमात थेट 67 टक्क्यांची भरमसाठ वाढ करणे अयोग्य आहे. सध्या हॉलमार्किंगचे प्रमाण प्रचंड वाढले असताना, प्रति दागिना दर 45 रुपयांवरून 75 रुपये का करण्यात आला, याचे स्पष्टीकरण उद्योग क्षेत्राला मिळायला हवे. शुल्क वाढवण्याऐवजी प्रशासनाने बनावट हॉलमार्किंग आणि बेकायदेशीर कारभारावर आधी कारवाई करायला हवी, अशी मागणी जीजेसीचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी केली.
























































