
चित्रपटसृष्टीतील बहुमूल्य योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते अनंत नाग यांना 2024 सालचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार जाहीर झाला आहे. 22 सप्टेंबर रोजी गुजरातच्या केवडिया येथे आयोजित होणाऱया 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
4 सप्टेंबर 1948 रोजी जन्मलेले अनंत नाग हे कन्नड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते म्हणून ओळखले जातात. सहज अभिनय, धीरगंभीर आवाज हे त्यांचे खास वैशिष्टय़े. कन्नडसह हिंदी, तेलगू, तमिळ, मराठी, मल्याळम, इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व आहे. आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनंत नाग यांनी 300 हून अधिक अनेक भाषिक चित्रपटांमध्ये काम केले. 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या कन्नड ब्लॉकबस्टर चित्रपट ‘केजीएफ’ मध्येही त्यांनी महत्वाची भूमिका केली होती.
अनेक पुरस्कारांनी सन्मानित
अनंत नाग यांना 2025 मध्ये ‘पद्मभुषण’ हा देशाचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित केले गेले. त्यांना आजवर पाचवेळा कर्नाटक राज्य चित्रपट पुरस्कार, पाचवेळा फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
‘मालगुडी डेज’मुळे घराघरात ओळख
ज्येष्ठ लेखक आर. के. नारायण यांच्या कथांवर आधारित दूरदर्शनवरील लोकप्रिय मालिका ‘मालगुडी डेज’मुळे अनंत नाग यांना घराघरात ओळख मिळाली. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.




























































