
अरबी समुद्रात मंगळवारी मध्यरात्री हिंदुस्थानी नौदलाच्या एका जहाजाला पाकिस्तानी युद्धनौकेने धडक दिली. हिंदुस्थानी जहाजाचे कसलेही नुकसान झाले नाही. मात्र ही मस्ती पाकिस्तानी नौदलाच्या अंगलट आली असून त्यांच्या जहाजाचे प्रचंड नुकसान झाल्याचे उघडकीस आले आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना पाचारण करून तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.
‘ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा’चा भाग म्हणून हिंदुस्थानची एक नौका गस्तीवर होती. त्यावेळी पाकिस्तानी नौदलाच्या ‘सी स्पार्क’ सरावात सहभागी झालेल्या ‘पीएनएस हुनैन’ या युद्धनौकेने अचानक वेग वाढवला आणि हिंदुस्थानी युद्धनौकेच्या उजव्या बाजूने तिच्या पुढच्या भागाला धडक दिली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
1991 च्या कराराची दिली आठवण
हिंदुस्थानने पाकिस्तानला 1991 च्या कराराची आठवण दिली आहे. त्या करारानुसार, आंतरराष्ट्रीय समुद्री हद्दीत असताना दोन्ही देशांच्या जहाजांनी आणि पाणबुडय़ांनी काही मार्गदर्शक तत्त्वे पाळणे अपेक्षित आहे. अपघात टाळण्यासाठी दोन्ही देशांच्या जहाजांनी एकमेकांपासून किमान तीन नॉटिकल मैल (सुमारे 5.6 किमी) अंतर राखणे आवश्यक आहे. लष्करी सराव, सैन्याच्या डावपेचात्मक हालचालींबाबत पूर्वसूचना देणे गरजेचे आहे. पाकिस्तानने या कराराचे उल्लंघन केले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घ्या, असे हिंदुस्थानने सुनावले आहे.
15 वर्षांपूर्वी नेमके असेच घडले होते!
पाकिस्तानी युद्धनौका हिंदुस्थानी जहाजाला धडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. 15 वर्षांपूर्वी 2011 साली नेमका असाच प्रकार घडला होता. पाकिस्तानची बाबर युद्धनौका हिंदुस्थानच्या गोदावरी युद्धनौकेला घासून गेली होती. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये आरोप-प्रत्यारोपही झाले होते.




























































