
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, कृत्ता वारिणा इंद्रायण्या सुचित्रा।
दधानं परब्रह्मरूपं शयानं, भजे ज्ञानेश्वरं सच्चिदानंदरूपम् ?
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पावन चरणस्पर्शाने पुनीत झालेली अलंकापुरी म्हणजेच आपली देवाची आळदी। वारकऱ्यांच्या भक्तीने निनादणारी ही नगरी आणि इंद्रायणीच्या पवित्र काठावर वसलेले महाराष्ट्रातील श्रद्धास्थान ज्या नदीला आपण आई मानतो, तीच इंद्रायणी आज वाढतं प्रदूषण, सांडपाणी आणि औद्योगिकीकरणाच्या विळख्यात सापडली आहे. या गंभीर संकटाकडे प्रशासन आणि गणेशभक्तांचे लक्ष वेधण्यासाठी डिलाईल रोड येथील करण पाटील यांनी सामाजिक संदेश देणारा देखावा साकारला आहे.
पाटील यांच्या गणेशोत्सवाचे यंदाचे २० वे वर्ष आहे. आतापर्यंत त्यांनी किल्ले रायगड, लोअर परळ स्टेशन, बीडीडी चाळ अशा अनेक संकल्पना घेऊन देखावे साकारलेत. या देखाव्याची सजावट करण्यासाठी पाच जणांनी तीन महिने अहोरात्र मेहनत घेतली. लाकडाचे प्लाय, पुठ्ठा आणि पर्यावरणपूरक रंग वापरून हा लक्षवेधी देखावा उभा राहिला आहे. अशी माहिती पाटील यांनी दिली. ‘श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतानाच, आपण आपल्या पवित्र नद्या वाचवण्याचा भक्कम संकल्प करायला हवा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
निसर्गाचा बळी देऊन विकास नको…
‘नदीला आपण आई मानतो, मग तिची ही दुरवस्था उघड्या डोळ्यांनी कशी पाहायची?’ असा प्रश्न पाटील यांनी कलाकृतीतून मांडलाय विकास जरूर व्हावा, पण तो निसर्गाचा बळी देऊन नसावा, केवळ आळंदीच नव्हे, महाराष्ट्रातील सर्वच धार्मिक नद्यांचे पावित्र्य अबाधित राखले पाहिजे, उत्सव केवळ दिव्यांच्या सजावटीने नाही, तर निर्मळ इंद्रायणीच्या प्रवाहानेच साध्य होईल, असे मुद्दे त्यांनी सजावटीच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.
























































