फ्रिजमध्ये सामान ठेवताना अडचण होतेय? या सोप्या ट्रिक्सने फ्रिज ठेवा नेहमी नीटनेटका आणि स्वच्छ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरातील अन्नपदार्थ ताजे ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर केला जातो. पण तुमच्या घरात लहान फ्रिज असेल, त्यामध्ये भाज्या, फळे, दूध, डबे आणि बाटल्या ठेवताना अडचण निर्माण होते. यामुळे फ्रिज लवकर घाण होण्याची शक्यता असते. तसेच सामान शोधताना वेळ जातो आणि कधीकधी, आपण मागच्या बाजूला ठेवलेल्या वस्तूंबद्दल विसरतो आणि त्या खराब होतात. हिरव्या भाज्या अनेकदा रेफ्रिजरेटरच्या खालच्या कप्प्यात ठेवून विसरल्या जातात. ज्यामुळे त्या लवकर खराब होतात.  तुम्हीसुद्धा तुमचा रेफ्रिजरेटर जास्त भरत असाल तर काही सोप्या सवयी अंगीकारल्यास फ्रिज स्वच्छ, नीटनेटका आणि व्यवस्थित ठेवण्यास मदत होऊ शकते. जाणून घ्या या पद्धती….

कच्च्या आणि शिजवलेल्या गोष्टी वेगळ्या ठेवा
हिंदुस्थानी घरांमध्ये भाज्यांसोबत दूध, दही, पनीर आणि शिजवलेले अन्न ठेवले फ्रिजमध्ये ठेवले जाते. कच्चा मांसाहार (मटण/मासे) किंवा पनीर नेहमी वेगळ्या बंद डब्यात ठेवा. मांसाहारी पदार्थ फ्रिजच्या सर्वात खालच्या शेल्फमध्ये ठेवा, जेणेकरून त्याचे पाणी इतर पदार्थांवर पडणार नाही.

गरजेपूर्वी फळे आणि भाज्या चिरू नका
सकाळची घाई टाळण्यासाठी अनेकजण रात्रीच भाज्या चिरून ठेवतात. परंतु चिरलेल्या भाज्या आणि फळे अख्ख्या भाज्या व फळांपेक्षा लवकर खराब होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो भाज्या वापरायच्या वेळीच चिरा. आधीच चिरून ठेवायच्या असतील तर कोरड्या आणि एअरटाईट डब्यात ठेवा.

वारंवार फ्रिज उघडणे टाळा
वारंवार फ्रिज उघडल्याने विजेचा वापर वाढतोच, पण फ्रिजमधील तापमानही बिघडते. यामुळे आधीच ठरवून घ्या की काय बाहेर काढायचे आहे आणि आवश्यक ते सर्व सामान एकाच वेळी बाहेर काढा. विशेषतः मुलांना वारंवार फ्रिज उघडण्यापासून रोखा.

प्रत्येक सामानासाठी ठराविक जागा करा
दूध, दही, पनीर एका विशिष्ट शेल्फवर, उरलेली भाजी आणि आमटी वेगळ्या भागात, फळे आणि भाज्या खाली असलेल्या व्हेजिटेबल ड्रॉवर मध्ये, तर अंडी एग ट्रे मध्ये, बटर, जॅम, सॉस आणि लोणचे फ्रिजच्या दरवाजाच्या शेल्फमध्ये, यामुळे सामान शोधण्यात वेळ जात नाही आणि फ्रिज विस्कटलेला दिसत नाही.

‘Eat Me First’ असा डबा बनवा
फ्रिजमध्ये अनेकदा रात्रीची उरलेली भाजी, थोडी आमटी राहून जाते. यासाठी एक छोटा डबा बनवा ज्यावर ‘Eat Me First’ लिहा. 1-2 दिवसांत संपवायचे असलेले अन्न त्यात ठेवा. यामुळे शिळे अन्न नजरेसमोर राहील आणि अन्नाची नासाडी होणार नाही.

उरलेले अन्न उघड्या भांड्यात ठेवू नका
उरलेली भाजी, आमटी किंवा भात उघड्या मोठ्या भांड्यात ठेवण्याऐवजी झाकण असलेल्या लहान डब्यांमध्ये ठेवा. यामुळे एका अन्नाचा वास दुसऱ्या पदार्थाला येत नाही. तसेच, गरम अन्न थेट फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी ते थोडे थंड होऊ द्या आणि मगच ठेवा.

प्रत्येक गोष्ट फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही
बटाटे आणि कांदे थंड, कोरड्या आणि हवेशीर जागी बाहेर ठेवा. केळी आणि टोमॅटो नेहमी खोलीच्या तापमानावर ठेवा, आणि मधही फ्रिजमध्ये ठेवण्याची गरज नाही ते बाहेरच चांगले राहते.