परतीच्या प्रवासासाठी एसटी २ हजार ५०७ गाड्या सोडणार, रविवारी चाकरमानी मोठ्या संख्येने मुंबईकडे रवाना होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेले पाच दिवस गणपतीबाप्पाची मनोभावे पुजा केल्यानंतर उद्या वाजत-गाजत गौरीगणपतींचे विसर्जन होणार आहे. गौरी गणपती विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला निघणार आहेत.चाकरमान्यांसाठी रत्नागिरी एसटी विभागातून उद्या शनिवारी २३७ बस आणि रविवारी १६६१ बस सुटणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी रत्नागिरीतून एसटीच्या २ हजार ५०७ गाड्या सुटणार आहेत.

सोमवारी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. घरच्या गणपतीसाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावी दाखल झाले आहेत. मुंबईत गावी येण्यासाठी एसटीने जादा गाड्यांची आणि ग्रुप बुकिंगची सोय केली होती. गौरीगणपती विसर्जनानंतर चाकरमानी पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहेत. शनिवार-रविवार असल्यामुळे चाकरमानी उद्या मुक्काम करून रविवारी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत त्यामुळे एसटीने रविवारी २० तारखेला १६६१ गाड्या सज्ज ठेवल्या आहेत. शनिवारी २३७ बस सुटणार आहेत.त्यानंतर सोमवारी २१ सप्टेंबरला ४५७ गाड्या सोडण्यात येणार आहेत. अनंत चतुर्दशी पर्यंत एसटी जादा गाड्या सोडणार आहे.२२ सप्टेंबरला ५१ गाड्या, २३ सप्टेंबरला १९ गाड्या, २४ सप्टेंबरला १९ गाड्या, २५ सप्टेंबरला २२ गाड्या, २६ सप्टेंबरला २० आणि २७ सप्टेंबरला २१ गाड्या सुटणार आहेत. परतीच्या प्रवासासाठी २ हजार ५०७ गाड्या सोडण्यात येणार आहेत.

कोकण रेल्वे फुल्ल

कोकण रेल्वेनेही गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडल्या आहेत. यासर्व गाड्यांचे बुकींग फुल्ल झाले आहेत.काही खासगी ट्रॅव्हल्स कोकणात वळवण्यात आल्या आहेत.