
गणरायाच्या आगमनाने आधीच भक्तिमय झालेल्या कोकणातील वातावरणात आता गौराईच्या पूजनाने चैतन्याची भर पडली आहे. गौराईच्या आवाहनानंतर आज घराघरांत तिचे विधिवत पूजन करण्यात येत असून, धामणीसह परिसरातील वाड्या -वस्त्यांमध्ये महिलांच्या उत्साहाला अक्षरशः उधाण आले आहे.
कोकणच्या मातीत सण म्हणजे केवळ पूजा-अर्चा नव्हे, तर नात्यांची ऊब, माहेरची ओढ आणि परंपरेचा जिवंत वारसा! याच भावनेने गौराईचे स्वागत केले जाते. काल आवाहन करून घरी आणलेल्या गौराईचे आज मोठ्या भक्तिभावाने पूजन करण्यात आले. पहाटेपासूनच महिलांची लगबग सुरू होती. अंगण सारवून सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या, घराघरांत फुलांची सजावट करण्यात आली आणि गौराईसमोर विविध नैवेद्य मांडण्यात आले.
धामणीतील वाड्या- वस्त्यांमध्ये तर गौराई पूजनाचा उत्साह वेगळाच पाहायला मिळत आहे. पारंपरिक पद्धतीने गौराईची सजावट करून महिलांनी आरती, पूजन आणि धार्मिक विधी केले. अनेक घरांमध्ये सुवासिनींना निमंत्रित करून हळदी-कुंकू समारंभही पार पडत आहे.गौराई म्हणजे कोकणी महिलांसाठी केवळ एक धार्मिक परंपरा नाही; ती माहेरची आठवण, घरातील सुख-समृद्धीची आस आणि पिढ्यान्पिढ्या जपलेल्या संस्कृतीचा भावनिक धागा आहे. त्यामुळे गौराईच्या पूजनाच्या दिवशी प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
गणरायाच्या जयघोषाने दुमदुमणारी धामणीची वाडी-वस्ती आता गौराईच्या मंगल आरतीने भारावून गेली आहे. बाप्पाच्या पाठोपाठ आलेल्या गौराईने कोकणच्या घराघरांत श्रद्धा, आनंद आणि आपलेपणाची नवी पालवी फुलवली आहे.

























































