नो ओव्हरटाईम, नो डिस्टर्बन्स? ऑफिसमध्ये हेडफोन घालून काम, Gen Z चा ऑफिस वर्कचा नवा ट्रेंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेव्हापासून Gen Z कॉर्पोरेट कल्चरचा भाग बनले आहेत, तेव्हापासून त्यांनी काम करण्याच्या अनेक जुन्या पद्धती पूर्णपणे बदलून टाकल्या आहेत. Gen Z ला ऑफिसमध्ये काम तर करायचे आहे. पण स्वतःच्या अटींवर आणि सोयीनुसार. 9-5 च्या शिफ्टचे काम जर 6 तासांत संपत असेल, तर विनाकारण जास्त वेळ थांबण्याऐवजी ते वेळ झाल्यावर घरी जाणे पसंत करतात. कामाच्या वेळी कोणी मध्येच बोललेले त्यांना अडथळा वाटू लागतो. पण गाणी ऐकत काम करणे मात्र त्यांचा सर्वात आवडता फंडा आहे.

ऑफिसमध्ये हेडफोन घालून काम करणे हे पूर्वी बॉस किंवा मॅनेजर्सना आक्षेपार्ह वाटायचे. हेडफोन घातलेला कर्मचारी फक्त गाणी ऐकतोय आणि काम करत नाहीये, असा समज असायचा. परंतु Gen Z ने ही संकल्पना बदलून हेडफोन घालून काम करण्याला ऑफिस संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनवले आहे. त्यांच्या मते, गाणी ऐकत काम केल्याने त्यांची काम करण्याची क्षमता आणि लक्ष केंद्रीत करण्याची ताकद वाढते.

Gen Z साठी हेडफोन एकाच वेळी एकाग्रता आणि सोबत दोन्हीचे काम करतो. काम करताना बाहेरील जगापासून आणि ऑफिसच्या गोंधळापासून स्वतःला पूर्णपणे वेगळे ठेवण्यासाठी ते हेडफोन वापरतात. हेडफोनमधील गाणी त्यांना फ्रेश ठेवतात आणि त्यांच्या कामाचा फ्लो अधिक चांगला करतात.

Gen Z चे हेडफोनशी असलेले नाते केवळ ऑफिसच्या डेस्कपुरते मर्यादित नाही. हेडफोन हा त्यांच्यासाठी एका सर्वोत्तम मित्रासारखा आहे, ज्याला ते प्रत्येक ठिकाणी सोबत घेऊन जातात. मेट्रो, जिम, कॅफे किंवा ऑफिस. हेडफोन हा त्यांचा कायमचा सोबती बनतो. कधी गाणी त्यांचा मूड चांगला करतात, कधी प्रवास सोपा करतात, तर कधी लोकांच्या गर्दीत असतानाही त्यांना स्वतःचा खासगी वेळ मिळवून देतात. त्यामुळेच हेडफोन हे Gen Z साठी फक्त एक तंत्रज्ञान न राहता, एक वैयक्तिक कम्फर्ट स्पेस बनले आहे.