
फसवणूक करणारे आणि नकोसे व्यावसायिक फोन कॉल्स रोखणसाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाने नवे नियम लागू केले आहेत. रोबो कॉल्स, ऑटोमेटेड कॉल्सला नियमनाच्या कक्षेत आणले असून एआयद्वारे अशा कॉल्सची ओळख पटविली जाणार आहे. असे कॉल्स करणाऱयांची दूरध्वनी जोडणी बंद करण्यात येईल तसेच वर्षभरासाठी कंपनीला ब्लॅकलिस्ट केले जाऊ शकते. याशिवाय ऑटोमेटेड कॉलसवर कंपन्यांना पाच पैसे प्रति मिनिट शुल्कदेखील द्यावे लागणार आहे.
ट्रायच्या नव्या नियमावलीनुसार विनाकारण कॉल करून ग्राहकांना त्रास देणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यानुसार, दूरसंचार कंपन्या स्पॅम कॉल्स करणारे क्रमांक ओळखणार आहेत. 10 दिवसांमध्ये एकच व्यक्तीचे किंवा कंपनीचे पाच संशयास्पद क्रमांक आढळल्यास कारवाई करण्यात येईल. या कंपन्यांची आऊटगोइंग सेवा बंद करण्यात येईल तसेच रि-केवायसी करावी लागेल. कंपन्यांनी न कळवता रोबोकॉल केल्यास पाच पैसे प्रतिमिनिट शुल्क द्यावे लागेल.
एआयची मदत
एखाद्या कंपनीकडे चौकशी केल्यास ग्राहकांना केवळ 7 दिवसच कंपनी कॉल करू शकेल. याशिवाय एसएमएस पाठवताना दिशाभूल करणरे हेडर टाकल्यास 6 तासांमध्येच कंपनीची सेवा ब्लॉक करण्यात येईल. ग्राहकांनी तक्रार केल्यास एआयच्या मदतीने तपासणी होईल. तीन वेळा तक्रारी आल्यास लगेच कारवाई सुरू करण्यात येईल.
























































