
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांनी प्रभावित असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या निस्सीम निष्ठा आणि श्रद्धेचे दर्शन पदोपदी होत असते. यंदाच्या गणेशोत्सवातही अशाच एका निष्ठावंत, कट्टर शिवसैनिकाने आपल्या घरच्या गणरायाच्या दरबारात महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि तमाम शिवसैनिकांच्या भावविश्वाचे प्रतीक असलेल्या ‘शिवसेना भवन’ची प्रतिकृती साकारली आहे. शिवसैनिक संतोष देवळेकर यांच्या या अनोख्या श्रद्धेचे आणि त्यांच्या कलाकृतीचे सर्वत्रच काwतुक होत आहे.
संतोष देवळेकर हे शिवसेनाप्रणित रेल कामगार सेनेचे पेंद्रीय उपाध्यक्ष आहेत. त्यांनी कल्याण येथील आपल्या घरात गणरायाची प्रतिष्ठापना करतानाच आकर्षक देखाव्यातून शिवसेनेवरील निस्सीम प्रेम व्यक्त केले आहे. संतोष देवळेकर व त्यांचे बंधू अमित देवळेकर या दोघांनी अत्यंत आत्मियतेने ‘शिवसेना भवन’ची भव्य प्रतिकृती देवघरात साकारली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या दैवतांना डोळ्यापुढे ठेवून देवळेकर बंधूंनी ‘शिवसेना भवन’ साकारले आहे. कल्याण व आसपासच्या परिसरात त्यांची कलाकृती काwतुकाचा विषय बनली असून गणरायाच्या दर्शनाबरोबरच ‘शिवसेना भवन’ची देखणी प्रतिकृती पाहण्यासाठी देवळेकर कुटुंबियांच्या घरी सध्या गर्दी होऊ लागली आहे. शिवसेना हा माझ्यासाठी केवळ राजकीय पक्ष नसून माझ्या मनात, विचारात आणि जीवनमूल्यांमध्ये रुजलेली एक भावना आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्रासाठीच्या व्यापक दृष्टिकोनाने प्रभावित होऊन मी संघटनेचे काम करत आहे. माझ्या कुटुंबियांच्या सहकार्याने ‘शिवसेना भवन’शी जोडलेल्या लाखो शिवसैनिकांच्या भावना आणि आठवणी समाजासमोर मांडण्याचा छोटासा प्रयत्न देखाव्यातून केला आहे, अशी प्रतिक्रिया संतोष देवळेकर यांनी दिली.


























































