
वरळी आणि नायगाव बीडीडीपाठोपाठ ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडीवासीयांचे अलिशान घराचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पुनर्वसन इमारत क्र. 1मधील दोन विंगला भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) मिळाले असून मुख्यमंत्र्यांची वेळ मिळताच 342 रहिवाशांना चावी वाटप केले जाणार आहे.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग या बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात आहे. महाविकास आघाडीच्या काळात या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे वेळोवेळी या प्रकल्पांना भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतात. ना.म. जोशी मार्ग येथील 32 चाळींमधील 2560 रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी 23 मजल्यांचे 14 टॉवर उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
पुनर्वसन इमारत क्र. 1मधील ई, एफ, जी विंगमधील 557 पुनर्वसन सदनिकांचे वितरण केले जाणार आहे. ई आणि जी विंगला ओसी मिळाली असून मुख्यमंत्र्यांची वेळ मिळताच 342 रहिवाशांना चावी वाटप केले जाणार आहे. तसेच तिसऱया म्हणजेच एफ विंगचे फिनिशिंगचे काम अंतिम टप्प्यात असून त्यामधील 215 रहिवाशांनादेखील महिनाभराच्या आत घराचे वाटप केले जाणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.




























































