
पुण्यातील नागरी समस्या सोशल मीडियावर प्रभावीपणे मांडणारे संतोष पंडित यांची येरवडा तुरुंगातून सुटका झाली आहे. सोशल मीडियावर लोकांनी दिलेला तुफान प्रतिसाद पाहून यावेळी पंडित भावुक झाले. ‘आता थांबणार नाही, कुठेही टाका आपली तयारी आहे,’ असा इशारा त्यांनी दिला.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि एका नगरसेविकेविषयी अवमानकारक भाषेचा वापर केल्यामुळे संतोष पंडित यांना अटक करण्यात आली होती. सुटकेनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यापुढील काळातही लोकांच्या समस्यांना वाचा पह्डणार आणि त्यासाठी आपल्या भाषेमध्येही सुधारणा करणार असे त्यांनी सांगितले. कोठडीत असताना पोलिसांनी आपली चांगली प्रेमाने काळजी घेतली, असे सांगतानाच कोथरुड पोलीस ठाण्यात कोठडीच नसल्याने आपल्याला खडकी व येरवडा तुरुंगात ठेवले गेले, असे पंडित यांनी सांगितले. बाहेर आल्यानंतर लोकांचा प्रतिसाद पाहून आपल्याला पुन्हा लढण्याची ताकद मिळाली, असे पंडित यांनी सांगितले.
तुरुंगातही अनेकांनी आपल्याला ओळखले आणि त्यांनी त्यांच्या व्यथा आपल्याला सांगितल्या, अशी माहिती संतोष पंडित यांनी दिली.

























































