
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) आता एनसीएमसी कार्डची नोंदणी सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. 21 सप्टेंबरपासून आधारकार्ड संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपीच्या आधारे एनसीएमसी कार्डची नोंदणी करता येणार आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरणात अडचण येणाऱया लाभार्थ्यांना एसटी महामंडळाच्या या नव्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी आणि वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत प्रवाशांना सवलतीचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा यासाठी महामंडळाने काही महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यानुसार बायोमेट्रिक जुळत नसल्यास आधार ओटीपीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
21 सप्टेंबरपासून याचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे जुळत नाहीत, अशा लाभार्थ्यांना आधारकार्ड संलग्न मोबाईल क्रमांकावर प्राप्त ओटीपीच्या आधारे एनसीएमसी कार्डची नोंदणी करता येणार आहे. तसेच कार्ड हरवले वा चोरीला गेल्यास ते ब्लॉक करून 199 रुपये शुल्क भरून नव्याने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
क्यूआर कोड पावतीद्वारे सवलतीचे तिकीट
एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी करणाऱया सवलतधारक प्रवाशांना क्यूआर कोड असलेली पावती देण्यात येणार आहे. ही पावती एसटीच्या ईटीआयएम मशीनवर स्पॅन केल्यानंतर प्रवाशाला सवलतीचे तिकीट मिळणार आहे. ही नोंदणी पावती 30 दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांनी 30 दिवसांच्या आत एनसीएमसी कार्ड ऑक्टिव्ह करून त्यामध्ये टॉप-अप करणे आवश्यक असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.
25 सप्टेंबरपासून कार्ड वितरण
19 सप्टेंबरपर्यंत एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना 25 सप्टेंबरपासून कार्ड वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सवलतधारकांनी तातडीने नोंदणी करावी
एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी सर्व संबंधित सवलतधारक लाभार्थ्यांनी तात्काळ एनसीएमसी काaर्ड नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे.

























































