
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात आता सिंगापूर, दुबईच्या धर्तीवर पाण्याखालील सफरीचा थरार अनुभवता येणार आहे. त्यासाठी प्राणीसंग्रहालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे भूमिगत मत्स्यालय उभारण्यात येत असून त्यात दोन पारदर्शक टनेल असतील. यातून देशी-विदेशी प्रजातीचे सागरी जीव न्याहाळण्याची अपूर्व संधी पर्यटकांना मिळणार आहे.
तब्बल 62 कोटी रुपये खर्चून 14 व 36 मीटर लांब असे दोन टनेल बांधण्यात येत आहेत. मत्स्यालयाचे काम 50 टक्के पूर्ण झाले असून मार्च 2027पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले आहेत. वीरमाता जिजाबाई उद्यान व प्राणीसंग्रहालयास दररोज 7 ते 8 हजार पर्यटक भेट देतात. सुट्टीच्या दिवशी हा आकडा 20 हजारांच्या घरात जातो. प्राणीसंग्रहालयातील पेंग्विन जसे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत त्याचप्रमाणे भूमिगत मत्स्यालय पर्यटकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी व्यक्त केला.
चिमुकल्यांसाठी खास पॉप-अप विंडो
मत्स्यालयात 46 ते 70 विविध सागरी प्रजाती ठेवण्यात येणार आहेत. समुद्री जिवांसाठी आवश्यक असलेली पाण्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी 10 लाख लिटर क्षमतेची अत्याधुनिक ‘लाईफ सपोर्ट सिस्टीम’ बसविण्यात येत आहे. लहान मुलांसाठी विशेष ‘पॉप-अप विंडो’ची सुविधा असेल. तसेच चार चौकोनी, पाच वर्तुळाकार आणि दोन अर्धवर्तुळाकार टाक्यांमधून विविध जलचरांचे दर्शन घडणार आहे.
पेंग्विन प्रकल्पाची क्षमता वाढणार
महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्ष विस्तार प्रकल्पाचाही गुरुवारी आढावा घेतला. सध्या 21 पेंग्विन असलेल्या या प्रकल्पाची क्षमता 40 पेंग्विनपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे 200 चौरस मीटर क्षेत्राची वाढ करण्यात येत असून विद्यमान 1,800 चौरस फुटांच्या परिसरात आणखी 800 चौरस फुटांची भर पडणार आहे.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- सुमारे 5,500 चौरस फुटांचे हे मत्स्यालय असेल.
- मत्स्यालयात दोन भव्य अॅव्रेलिक टनेल असतील.
- 14 मीटर लांबीचा टनेल रंगीबेरंगी प्रवाळ माशांसाठी असेल.
- 36 मीटर लांबीचा दुसरा टनेल खोल समुद्रातील दुर्मिळ प्रजातींसाठी असेल.
- टनेलमधून चालताना पर्यटकांना 180 ते 360 अंशांपर्यंत दृश्य दिसणार.
- समुद्राच्या गर्भात फिरत असल्याचा थरार अनुभवता येणार.





























































