
ज्येष्ठ कवी, लेखक व विचारवंत दया पवार यांच्या 30 व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत आज त्यांच्या गौरवग्रंथाचे प्रकाशन होत आहे. त्यानिमित्त या गौरवग्रंथातील ज्येष्ठ विचारवंत अर्जुन डांगळे यांच्या लेखाचा हा संपादित अंश.
दयाची आणि माझी प्रत्यक्ष भेट आणि ओळख ही 1967 साली झाली. या भारावलेल्या काळात महाराष्ट्र बौद्ध साहित्य सभेने मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय-दादर, मुंबई येथे साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्या संमेलनाला डॉ. म. ना. वानखडे, डॉ. म. भि. चिटणीस, घनशाम तळवटकर, बाबुराव बागूल, दया पवार, वामन निंबाळकर, दिनेश लखमापूरकर, राजा ढाले आणि माझ्यासह जनार्दन वाघमारे, हिरा बनसोडे असे कित्येक जण उपस्थित होते. दुपारच्या जेवणाच्या वेळात काही निवडक मंडळी गप्पा मारत उभी होती. मी त्यांच्या भोवती आजूबाजूला घुटमळत होतो. त्या कोंडाळ्यात माझे गुरुजी प्रा. केशव मेश्राम हे होते. कुणीतरी त्यांना विचारले, “तुमच्या कॉलेजातला कविता करतो तो मुलगा आला की नाही?” मेश्राम सरांनी माझ्याकडे बघून “हा काय इथेच आहे”, असे म्हणून मला त्या कोंडाळ्यात सामील करून घेतले. माझी चौकशी करणाऱ्या व्यक्तीचे नाव होते दया पवार आणि त्या दिवसापासून आमच्या दोघांतील वयाचे अंतर कमी कमी होत जाऊन वैचारिकदृष्ट्या आणि मैत्रीच्या नात्याने आम्ही एकजीव झालो ते अखेरपर्यंत. दयाला ओशिवऱ्याच्या स्मशानभूमीत शेवटचा निरोप देईपर्यंत आजही तो माझ्या जगण्याचा, आठवणींचा अविभाज्य असा भाग आहे.
दया पवार माझ्या मते आंबेडकरी चळवळीचे एक सशक्त असे ‘प्रॉडक्ट’ आहे. रूढार्थाने तो आमच्यासारख्या चळवळीत, मोर्चात भाषणे देत नव्हता तरी चळवळीशी त्याची बांधिलकी होती आणि त्याचे कारणही तसेच होते. त्याचे बालपण, शिक्षण ज्या नगरच्या वसतिगृहात गेले तिथले वातावरण हे सामाजिक होते. मुंबईतदेखील त्याच्या रेल्वेमधील मित्रासोबत आंबेडकर भवन, दादर येथे त्याचा वावर असायचा. त्यावेळी तिथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात येत असे.
1972 साली राजा ढालेंचा ‘काळा स्वातंत्र्यदिन’ हा राष्ट्रध्वजासंबंधीचा लेख ‘साधना’ साप्ताहिकात प्रसिद्ध झाल्यानंतर काहूर उठले होते. ‘साधना’च्या समर्थनार्थ मी आणि नामदेव ढसाळने ‘दलित पँथर’तर्फे मोर्चा आयोजित केलेला. त्यात दया होता. नामदेवला पहिली अटक कुलाब्याच्या कौन्सिल हॉल येथील मोर्चासमोर भाषण करताना झाली होती. त्यावेळी रात्री नामदेवला भेटण्यासाठी बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये दया माझ्या सोबत होता. डॉ. बाबा आढाव हे जामीन राहिल्यावर नामदेवला सोडण्यात आले होते. या ‘साधना’च्या अंकात माझा आणि दयाचाही लेख होता. त्यातला दयाचा ‘विटाळ’ हाच लेख पुढे त्याच्या गाजलेल्या ‘बलुतं’चं बीज ठरला. ओरिएंट लॉंगमनच्या प्रिया आडारकर यांनी या लेखाचे इंग्रजी भाषांतर ‘मिरर’ या मासिकात केले होते.
दलित साहित्यातून कथा, कविता आणि स्वकथनातून जे अनुभवविश्व आविष्कृत आणि शब्दबद्ध होत होते त्याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. एक सिद्धहस्त आणि अनुभवसंपन्न आशय घेत नव्या जाणिवेच्या कविता दयाच्या ‘कोंडवाडा’ या कवितासंग्रहातून व्यक्त झाल्या होत्या. ‘ग्रंथाली’च्या अनेक बैठका, चर्चा होत होत्या. दयाच्या ‘विटाळ’ या कथासंग्रहाचा वाङ्मयीन विस्तार हा त्यातूनच जन्माला आला आणि पुढे काही काळानंतर ‘बलुतं’ प्रकाशित झालं.
दयाच्या गद्य लेखनाबद्दल मराठी साहित्य विश्वात आदर होता याचे कारण दयाच्या लिखाणात बटबटीतपणा, विद्रोही भावनांचा अवाजवी अतिरेक नव्हता. अतिशय संयत, पण समर्थपणे तो त्याच्या लेखात, कवितेत, कथेत विद्रोहाच्या, निषेधाच्या ठिणग्या पेरीत असे. शिवाय त्याच्या लेखनात सरळ, साधेपणा होता; पण त्यामागे अनुभवाच्या सच्चेपणाची आच असायची. सामाजिक विषमता, दांभिकता यांच्याविरुद्धचा निषेध करताना त्याचे लेखन अनेकदा उपहासाच्या वळणावर जाणारे होते, पण तितकेच वाचकाला अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य त्याच्या कथेत, कवितेत, गद्य लिखाणात होते. ‘बलुतं’चा विचार या सर्व अंगांनी करता येईल आणि तो होत आहे.
दया पवारच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, तो नुसता लेखक नव्हता. तो परिवर्तनवादी संवेदनशीलता असलेला लेखक-कार्यकर्ता होता. वरवर शांत, सौम्य चेहरा असलेल्या दयाच्या मनात आणि हृदयात विद्रोहाचा एक ज्वालामुखी सतत धगधगत असायचा. तो त्याच्या लिखाणातून, त्याच्या शैलीतून ते व्यक्त करायचा. कलावंताला आवश्यक असलेले आत्मभान हे दयात जात्याच होते. किंबहुना हे आत्मभानच त्याच्या लिखाणातील मूल्यगर्भ जाणिवांना चेतवत असे. दांभिकता आणि दाखवेगिरी करणाऱया प्रवृत्तींविरुद्ध तो भिडायचा. मग ते स्वकीय असोत वा इतर कोणी. नामदेव ढसाळ डोळ्यांसमोर उभा करून त्याने लिहिलेली ‘फिडेल’ नावाची कथा असो किंवा ‘चावडी’, ‘जागल्या’सारखी सदरे असोत, त्यात तो चळवळीतल्या अपप्रवृत्तींवर फटकारे मारायचा. एक गोष्ट मात्र त्यात होती. त्यात दुःस्वास, तिटकारा किंवा आक्रस्ताळेपणा नसायचा. उपहास, त्याग, तिरकसपणा यांचा आसरा घेत त्याचे लेखन वळण घ्यायचे.
‘बलुतं’ ही महाकाय अवकाश कवेत घेणारी बहुआयामी अशी कलाकृती आहे. दगडू मारुती पवार – दयानंद पवार – दया पवार या व्यक्तीचे ते केवळ आत्मकथन न राहता एका मूल्यगर्भ सामाजिक वेदनेचा तळ पेलणारी कलाकृती झाली आहे हे एक निर्विवाद सत्य असले तरी 1974 साली प्रकाशित झालेला दयाचा पहिला कवितासंग्रह ‘कोंडवाडा’ हा काहीसा दुर्लक्षित राहिला की काय? ही भावना जाणवते. संवेदनशील, निर्मळ मनाचे व्यक्तिमत्त्व हा दयाचा स्वभाव होता. दया पवारचे एकूण लिखाण वाचताना मला सतत चार्ली चॅप्लिनच्या सिनेमाच्या आठवणी येतात. आपले दुःख, वेदना – मग ती व्यक्तिगत असो वा सामाजिक असो- ती कलाकृतीत मांडताना त्याचे भडक चित्रण न करता एका संयत पातळीवर हसत खेळत किंवा खिलाडू वृत्तीने मांडणे आणि ती मांडताना उपहास, विनोद, व्यंगात्मक जाणिवांवर नेमके बोट ठेवणे याचाही वापर केला जाताना दिसतो. सरळ, साधी, स्वाभाविक आणि वाचकांची भाववृत्ती जागवणारी मराठी वळणाची भाषा लिहिणारे जे लेखक आहेत, त्यात दयाचा क्रमांक वरचा आहे. उपहास, विनोद यांचा योग्य वापर करून आपल्या विचारविश्वाशी ठाम राहूनही दया पवारांचे लेखन हे द्वेषाच्या पातळीवर न जाता ते वाचकांना संवेदनशील पातळीवर नेते. ‘बलुतं’वर अनेक अंगांनी लिखाण झाले आहे. मात्र ‘भाषाशास्त्रा’च्या पातळीवर तितकासा विचार झाला नाही.
आज दलित साहित्य हे जगभर पोहोचले आहे. तरीही दलित साहित्याची चळवळ उभी करताना तिला वैचारिक अधिष्ठान देऊन ती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ज्या लेखक-विचारवंतांनी केले त्यात अनेक दिग्गज आहेत. कारण कुठीही चळवळ ही कुणा एका व्यक्तीची मत्तेदारी नसते. चळवळ ही सामूहिक विचारांतून-कृतीतून उभी राहते. चळवळीतील नेतृत्वाची भूमिका कधी व्यक्तिगत नसते. सामूहिक वैचारिकतेचे सूत्र त्या पाठीशी असते. सांगायचा मुद्दा हाच की, अनेकांचे योगदान दलित साहित्य चळवळीच्या पाठीशी आहे. दया पवार हे व्यक्तिमत्त्व त्यातील एक ठळक आणि कृतीशील नाव होय.
दया सुत्त
संपादक- अर्जुन डांगळे, डॉ. माया पंडित, डॉ. प्रज्ञा दया पवार
प्रकाशन- लोकवाङ्मय गृह
पृष्ठे- 448 + 4
मूल्य- रुपये 1,000/-



























































