
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मोहिमेत असे निष्ठावंत सरदार होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्याला बहाल केले. यात ते एकटेदुकटे नव्हते तर संपूर्ण कुटुंबच स्वराज्याच्या विचाराने प्रभावित झालेले पाहायला मिळते. यापैकीच एक म्हणजे बांदल परिवार. महाराजांनी जेव्हा हिरडस जिंकून घेतला तेव्हा कृष्णाजी बांदल हातघाईच्या लढाईत मारले गेले. रायाजी आणि कोयाजी बांदलही याच परिवारातले. दोघेही शूर आणि निडर. अफजलखान वधप्रसंगी बांदलांनी अपूर्व शौर्य दाखवले. रायाजी आणि कोयाजी यांच्या तुकडीने अफजलखानाच्या सैन्याचा धुव्वा उडवला. स्वराज्यावरील आदिलशाहीचे आक्रमण मोडीत काढण्यासाठी महाराजांनी पन्हाळगड निवडला. यावेळी बांदल सेनेने याचे नेतृत्व केले. याच सेनापती कोयाजी बांदल यांनी लाल महालात दबा धरून बसलेल्या शाहिस्तेखानाला पळता भुई थोडी केली. मात्र या हातघाईच्या लढाईत त्यांच्यावर जवळून खोलवर वार झाले, जे भरून निघाले नाहीत. पुढे त्यांचे भोर येथे निधन झाले. भोर जवळील नेकलेस पॉईंट येथे त्यांची समाधी आहे.




























































