
जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र ओबीसी कॉलम असावा यासाठी ओबीसी समाजाने एल्गार पुकारला आहे. या मागणीसाठी व्यापक आंदोलन उभारले जाणार असून त्यात 1 नोव्हेंबरला देशव्यापी चलो दिल्ली आंदोलनासह 2 ऑक्टोबरपासून सत्याग्रह व 25 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय मोर्चाचा कार्यक्रम आखला गेला आहे.
विदर्भातील ओबीसी नेते, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज नागपूरमध्ये पार पडली. त्या बैठकीनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली. सरकारने जनगणनेच्या प्रक्रियेबाबत घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ओबीसींची खरी लोकसंख्या समोर आली नाही, तर त्यांच्या प्रतिनिधित्वाचा आणि आरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. त्यामुळे ओबीसींची स्वतंत्र कॉलमसह जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, ही आमची स्पष्ट मागणी आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
13 सप्टेंबर रोजी दिल्लीत देशभरातील सुमारे 65 ओबीसी संघटनांची बैठक झाली. या बैठकीतील निर्णयांच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी आंदोलनाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्राr जयंतीनिमित्त तालुका स्तरावर सत्याग्रह, 25 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय आंदोलन व मोर्चे आणि त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.































































