राहुल गांधींनी भाजप-RSS ची सिस्टीम उघडकीस आणली, देशभरात घुमतोय विद्यार्थ्यांचा आवाज – जयराम रमेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी रविवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) देशाची शिक्षण व्यवस्था पोखरून काढल्याचा आणि भ्रष्ट केल्याचा गंभीर आरोप केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना दाबून ठेवणारी ही सिस्टीम उघडकीस आणली असून, सरकारला जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असल्याचे रमेश यांनी म्हटले आहे.

X वर पोस्ट करत जयराम रमेश यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देशाची शिक्षण व्यवस्था, अर्थव्यवस्था, राजकारण आणि सर्व प्रमुख संस्थांवर भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी ताबा मिळवला असून, त्यांनी संपूर्ण व्यवस्थेला पोखरून काढले असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थी प्रश्न विचारतात आणि उत्तरदायित्वाची मागणी करतात, यामुळे या सिस्टीमला विद्यार्थ्यांची भीती वाटते. मात्र आता राहुल गांधी त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याने विद्यार्थ्यांमधील भीती नाहीशी झाली असून त्यांचा आवाज संपूर्ण देशभरात घुमत असल्याचे रमेश म्हणाले आहेत.

दरम्यान, मध्य प्रदेशातील इंदूर येथे शनिवारी राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या कार्यक्रमात एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेतील विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. याच संदर्भात बोलताना राहुल गांधी यांनी सध्याचा लढा हा या सिस्टीमविरुद्ध असल्याचे म्हटले होते. वरच्या पातळीवर बसलेले केवळ सहा लोक ही संपूर्ण यंत्रणा चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला.