हॉस्टेलच्या जेवणात झुरळ, नाश्त्यात मेलेल्या अळ्या; चंद्रपूरातील बाबूपेठ येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी भोजनाच्या निकृष्ट दर्जाविरोधात जोरदार आवाज उठविला आहे. विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून जेवणात विविध प्रकारचे किडे, झुरळे आणि अळ्या आढळत आहेत. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांच्या ताटात झुरळ सापडले, त्यानंतर नाश्त्यामध्ये मेलेल्या अळ्या आढळल्या. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही तर वरणामध्ये किडे दिसून आले.

आज तर परिस्थिती आणखी गंभीर बनली. विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार जेवणामध्ये उंदराची विष्ठा आणि मेलेल्या उंदराचे अवशेष आढळून आले. या घटनेनंतर विद्यार्थिनींचा संताप उफाळून आला असून त्यांनी भोजनावर बहिष्कार टाकत आंदोलन सुरू केले आहे. मागील चोवीस तासांपासून अनेक विद्यार्थिनींनी जेवण न करता महाविद्यालय प्रशासनाविरोधात निषेध नोंदविला आहे. हॉस्टेलमधील विद्यार्थिनींचे म्हणणे आहे की, अनेक वेळा तक्रारी करूनही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. उलट भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्याऐवजी प्रशासन त्याची बाजू घेत असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदार बदलण्यात यावा आणि विद्यार्थिनींना स्वच्छ, सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींनी केली.

मात्र महाविद्यालय प्रशासनाने या प्रकाराकडे वेगळ्या दृष्टीने पाहत स्पष्टीकरण दिले आहे. हॉस्टेलमध्ये दररोज 300 ते 400 विद्यार्थिनींसाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक केला जात असल्याने एखादा किडा आढळणे ही सामान्य बाब असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.