
मुंबई आयआयटीमध्ये शिकणाऱया साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी केलेल्या तीव्र आंदोलनामुळे कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आयआयटी कॅम्पसला छावणीचे स्वरूप आले आहे.
आयआयटीच्या पवई कॅम्पसमध्ये वसतिगृहातील एका खोलीत शुक्रवारी सायंकाळी साहिल मृतावस्थेत आढळून आला होता. हे समजताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली. काही क्षणातच शेकडो विद्यार्थी कॅम्पसमध्ये जमले आणि त्यांनी निदर्शने सुरू केली. ही निदर्शने शनिवारी पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू होती. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण आहे. काही अनुचित घटना घडू नये म्हणून पवई, साकीनाका, मेघवाडी, जोगेश्वरी, अंधेरी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अतिरिक्त पोलीस बंदोबस्त येथे तैनात करण्यात आला आहे.
यवतमाळमधील गावी झाले अंत्यसंस्कार
शनिवारी साहिलचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. यवतमाळमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याचे वडील लवकरच मुंबईत येऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाची भेट घेणार असल्याचे समजते.
साहिल हा आयआयटीमध्ये एनर्जी अँड सायन्स इंजिनीअरिंग विभागाच्या दुसऱया वर्षात शिकत होता. परीक्षेत मोबाईल वापरल्याचा व चॅटजीपीटीतून उत्तरे पाहिल्याचा आरोप त्याच्यावर होता. या घटनेनंतर कारवाई होईल म्हणून साहिल अस्वस्थ होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केल्याचे बोलले जाते. मात्र साहिलच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून आमच्या मुलाचा नाहक बळी घेतला गेला. त्याचा छळ केला गेला, असा आरोप केला आहे.
प्राध्यापकासह काही वरिष्ठांवर गुन्हा
साहिलच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या वडिलांनी पवई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या आधारे पोलिसांनी प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यासह आणि काही वरिष्ठांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी हे सीसीटीव्ही फुटेज आणि जप्त केलेल्या पह्नची तपासणी करणार आहेत.




























































