
मुलुंड पश्चिमेकडील रेली वुल्फ परिसरात बेस्ट बस आणि ट्रॅव्हल्स बसची समोरासमोर धडक झाली. रविवारी सकाळी 5.50 वाजता झालेल्या या अपघातात स्टेअरिंग व्हिलचा जोराचा फटका बसल्याने बेस्ट बसचा चालक जखमी झाला. ट्रॅव्हल्स बसच्या धडकेमुळे बेस्ट बसच्या बॉनेटच्या भागात आग लागली होती. बस वाहकाने त्वरित बसमधील अग्निशमन यंत्राचा वापर करून आग विझवली आणि मोठा अनर्थ टळला.
मजास आगारातील मातेश्वरी कंपनीची भाडेतत्त्वावरील बस सीप्झवरून तीन हात नाका मार्गावर जात होती. मेट्रो मार्गिकेच्या बांधकामामुळे रेली वुल्फ येथे एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. याच भागात विरुद्ध दिशेने येणाऱया ट्रॅव्हल्स बसची बेस्ट बसला समोरासमोर धडक झाली. या धडकेमुळे बेस्टचा बसचालक संदीप कारंडे यांच्या पोटाला स्टेअरिंग व्हिलचा जोराचा फटका बसला आणि दुखापत झाली. वाहकाने कारंडे यांना तातडीने वैद्यकीय उपचारांसाठी अग्रवाल रुग्णालयात हलवले. बसमधील बॉनेटच्या भागात लागलेली आग विजवण्यासाठी वाहकानेच बसमधील अग्निशामक यंत्राचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवले.
ट्रॅव्हल्स बसच्या चालकाविरुद्ध गुन्हा
एकेरी वाहतूक सुरू असलेल्या मार्गावर ट्रव्हल्स बसच्या चालकाने विरुद्ध दिशेने बस चालवली होती. त्यामुळे अपघात झाल्याने ट्रव्हल्स बसच्या चालकाविरुद्ध मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अपघातग्रस्त गाडीची तपासणी करून पोलीस अधिक तपास करीत आहेत.



























































