इलावेनिलचा दुहेरी धमाका! नेमबाजीत दोन पदकांवर हिंदुस्थानचा अचूक नेम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या रणसंग्रामात पहिल्याच दिवशी हिंदुस्थानच्या नेमबाजांनी अचूक लक्ष्यवेध साधत पदकांची आतषबाजी सुरू केली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये इलावेनिल वलारिवानने वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही प्रकारांत रौप्य पदकाची कमाई करत हिंदुस्थानच्या पदक मोहिमेला दणदणीत सुरुवात करून दिली. नेमबाजीच्या मैदानातून आलेल्या या दोन रुपेरी यशामुळे पुढील स्पर्धांमध्ये हिंदुस्थानी नेमबाजांकडून पदकांची मोठी अपेक्षा निर्माण झाली आहे.

इलावेनिलचा डबल नेम

वैयक्तिक अंतिम फेरीत इलावेनिलने 252.4 गुणांची दमदार कमाई करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. सुवर्णपदकापासून ती अवघ्या 0.6 गुणांनी दूर राहिली. ताइचीने 253.0 गुणांसह आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. मात्र इलावेनिलने शेवटच्या क्षणापर्यंत दिलेली झुंज तिच्या आत्मविश्वासाची साक्ष ठरली.

यानंतर इलावेनिलने सोनम मस्कर आणि विदर्सा विनोद यांच्या साथीने सांघिक प्रकारातही रुपेरी निशाणा साधला. हिंदुस्थानी त्रिकुटाने पात्रता फेरीत 1898.0 गुण नोंदवत दुसरे स्थान मिळवले. चीनने 1904.2 गुणांसह नवा विश्वविक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदकावर कब्जा केला.

बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थान उपांत्यपूर्व फेरीत

नागोया, दि. 20 (वृत्तसंस्था)- आशियाई क्रीडा स्पर्धेच्या महिला बॅडमिंटनमध्ये हिंदुस्थानी संघाने कझाकिस्तानचा 3-0 असा सरळ गेममध्ये धुव्वा उडवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पी. व्ही. सिंधूच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानी खेळाडूंनी एकही गेम न गमावता प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः निष्प्रभ केले. तीनही एकेरी सामने जिंकत हिंदुस्थानने सामना अवघ्या तीन लढतींत खिशात घालत दोन वेळची ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधूने पहिल्याच सामन्यात कमिला स्मागुलोव्हाचा 21-7, 21-9 असा पराभव केला. अवघ्या 24 मिनिटांत सामना संपवत सिंधूने हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर युवा उन्नती हुड्डाने अलिस्सा कुलेशोव्हाला 21-7, 21-10 असे नमवत आघाडी 2-0 केली. तिसऱ्या लढतीत तन्वी शर्माने डायना नामेनोव्हाचा 21-5, 21-10 असा फडशा पाडला.

आशियाई क्रीडा स्पर्धा – पदक तालिका

 

चीन 11 6 3 20
जपान 6 7 7 20
कोरिया 4 3 7 14
कझाकिस्तान 4 0 2 6
थायलंड 3 1 0 4
म्यानमार 1 1 1 3
मकाऊ चीन 1 1 0 2
कुवैत 1 0 1 2
चिनी तैपेई 0 2 1 3
हाँगकाँग 0 2 0 2
हिंदुस्थान 0 2 0 2