
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या पदक मोहिमेला वेग येऊ लागला आहे. सुचिका तरियाल हिने मिश्र मार्शल आर्टस्च्या पारंपरिक प्रकारात उपांत्य फेरी गाठत हिंदुस्थानचे आणखी एक पदक निश्चित केले. दुसरीकडे हिंदुस्थानच्या महिला बॅडमिंटन संघाने कझाकस्तानचा 3-0 असा धुव्वा उडवत दिमाखदार सुरुवात केली. टेबल टेनिसमध्ये हिंदुस्थानने सिंगापूरला 3-2 असे नमवत थरारक विजय मिळवला. मात्र त्याआधी इराणविरुद्ध पुरुष संघाला 0-3 असा पराभव पत्करावा लागला.
टेबल टेनिसमध्ये इराणकडून पराभव
पुरुषांच्या एफ गटातील सामन्यात हिंदुस्थानला इराणकडून 0-3 असा पराभव स्वीकारावा लागला. मानुष शाहला नोशाद अलामियानने 3-0 अशी मात दिली. त्यानंतर मानव ठक्करचाही बेन्यामिन फराजीने 3-0 असा पराभव केला. हरमीत देसाईने नीमा अलामियानविरुद्ध कडवी झुंज दिली. मात्र निर्णायक क्षणी त्याला 2-3 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे इराणने सामना 3-0 असा खिशात घातला.
सिंगापूरविरुद्ध हिंदुस्थानचा थरारक पलटवार
टेबल टेनिसमध्ये इराणकडून धक्का बसल्यानंतर हिंदुस्थानी संघाने सिंगापूरविरुद्ध जोरदार पुनरागमन केले. हिंदुस्थानने हा सामना 3-2 असा जिंकत विजयावर शिक्कामोर्तब केले. यशस्विनी घोरपडेने निर्णायक सामन्यात लोय मिंगचा 5-11, 11-8, 12-10, 4-11, 11-9 असा पराभव करत हिंदुस्थानच्या विजयाची मोहर उमटवली. यशस्विनीने आपले दोन्ही सामने जिंकले, तर श्रीजा अकुलाने दुसरा सामना जिंकत हिंदुस्थानच्या पुनरागमनाची आशा कायम ठेवली.
जलतरणात ऋषभ सहावा
जलतरणातील 100 मीटर बॅकस्ट्रोकच्या अंतिम फेरीत हिंदुस्थानचा ऋषभ दास सहाव्या स्थानावर राहिला. उपांत्य फेरीत 54.85 सेकंदांची वेळ नोंदवत तो पाचव्या क्रमांकावर राहून अंतिम फेरीत पोहोचला होता. या प्रकारात चीनच्या जियायु शूने सुवर्णपदक पटकावले. जपानच्या हिदेकाजु ताकेहाराला रौप्य, तर दक्षिण कोरियाच्या जुहो लीला कांस्यपदक मिळाले.
वजन कमी करण्याच्या प्रयत्नात खेळाडू बेशुद्ध
वजन कमी करण्यासाठी सौना बाथ घेणे हिंदुस्थानचा एमएमए खेळाडू वरुण सान्यालच्या चांगलेच अंगलट आले. 77 किलो वजनी गटातील उपांत्यपूर्व सामना खेळण्यासाठी सज्ज असलेला वरुण शनिवारी रात्री वजन कमी करण्यासाठी सौना बाथमध्ये गेला होता. त्या वेळी तो अचानक बेशुद्ध पडला. एका नेपाळी खेळाडूच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्याने तातडीने वरुणला वैद्यकीय पथकाकडे पोहोचवले. तपासणीनंतर वरुणला वैद्यकीयदृष्टय़ा अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे त्याचे एशियाडमधील आव्हान संपुष्टात आले.



























































