
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच पदकदिवशी चीनने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत 11 सुवर्ण, 6 रौप्य आणि 3 कांस्य अशा तब्बल 20 पदकांची कमाई केली. पदकतालिकेत चीनने पहिल्या दिवसापासून आघाडी घेतली असून जलतरण, नेमबाजी, आधुनिक पेंटॅथलॉन, ट्रायथलॉन आणि वुशूमध्ये त्यांचा झंझावात पाहायला मिळाला.
जलतरण तलाव तर चीनच्या सुवर्णधडाक्याचा केंद्रबिंदू ठरला. अवघ्या 13 वर्षांच्या यू झिदीने महिलांच्या 200 मीटर बटरफ्लायमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा विक्रम मोडत सुवर्णपदक पटकावले. तिची 2ः05.08 सेकंदांची वेळ मागील विक्रमापेक्षा 0.49 सेकंदांनी वेगवान ठरली. ऑलिम्पिक विजेता पॅन झानलेनेही पुरुषांच्या 100 मीटर फ्रीस्टाइलमध्ये 47.61 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्ण कायम राखले.
नेमबाजीत चीनने 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात 1904.2 गुणांसह विश्वविक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. आधुनिक पेंटॅथलॉनमध्ये दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य अशी भर पडली, तर ट्रायथलॉनमध्येही चीनने सुवर्णासह पदके मिळवली. मात्र चीनला पहिल्या दिवसांचा हांगझाऊमधील 30 पदकांचा आकडा मागे टाकता आला नाही. गेल्या स्पर्धेत हांगझोऊमध्ये चीनने पहिल्याच दिवशी 20 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्यांसह एकूण 30 पदके जिंकली होती. असे असले तरी पहिल्या दिवसावर आणि पदक तालिकेवर चीनने कुणीही मागे टाकू शकत नाही, अशी आघाडी घेत आपले वर्चस्व कायम राखले आहे.




























































