महिलांच्या वेशात आले आणि दोन एटीएम फोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तेलंगणातील करीमनगरमध्ये शनिवारी रात्री चोरांनी एसबीआयच्या दोन एटीएममधून पैसे चोरले. चोर महिलांचे कपडे घालून आले होते. चोरांनी दुर्शेड आणि थिम्मापूर परिसरातील एटीएम मशीन गॅस कटरने कापून आत ठेवलेले पैसे बाहेर काढले.

रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या लोकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही ठिकाणी तपास सुरू केला आहे. चोरी झालेली रक्कम अद्याप समजू शकलेली नाही.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, चोरांनी शनिवारी रात्री एटीएमच्या गेटसमोर एक काळी कार उभी केली. कारमधून एक चोर मुलीचे कपडे घालून बाहेर आला. त्याच्या हातात स्प्रे होता. त्याने सर्वप्रथम एटीएमच्या बाहेर लावलेल्या कॅमेऱ्यावर स्प्रे केला. यानंतर चोर एटीएममध्ये गेला आणि तेथे लावलेल्या कॅमेऱ्यावरही स्प्रे केला. एटीएमच्या आत दोन कॅमेरे लावले होते. चोराने दोन्ही कॅमेऱयांवर स्प्रे मारला, त्यानंतर कॅमेऱयांमध्ये काहीही दिसेनासे झाले. चोरी केल्यानंतर चोरांनी एटीएम मशीनमध्ये ठेवलेली संपूर्ण रोकड काढून घेतली.