दुष्काळ, सागरी उष्णता आणि वणव्याची लाट; येत्या काही महिन्यांत महाप्रलयासारखे हवामान, 180 शास्त्रज्ञांनी दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील 180 हून अधिक पर्यावरण व हवामान शास्त्रज्ञांनी ‘एल निनो’बद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. 2026-27 चा एल निनो सर्वसामान्यापेक्षा अधिक प्रभावशाली असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिंदुस्थानातील जंगले, नद्या, समुद्र, पर्वत आणि वन्यजीवांवर यांचा परिणाम होऊ शकतो, अशी भीती आहे.

यासंदर्भातील संशोधनपर अभ्यास नुकताच झेनोडो प्लॅटफॉर्मवर ‘सुपर एल निनोची धडक-इकोलॉजिस्टसाठी इशारा आणि आव्हान’ या नावाने प्रसिद्ध झाला आहे. वैज्ञानिकांच्या मते, या वेळी प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान असामान्यपणे वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ही परिस्थिती सामान्य एल-निनो असणाऱ्या वर्षांपेक्षा खूप वेगळी असू शकते. म्हणून त्याचा परिणाम समजून घेण्यासाठी आणि नोंदवण्यासाठी आतापासूनच मोठ्या प्रमाणावर देखरेख करणे आवश्यक आहे.

पाऊस कमी झाल्यास पाण्याची टंचाई वाढू शकते, ज्याचा थेट परिणाम शेती, जंगले आणि पशुपालनावर होईल.

नोव्हेंबर 2026 पासून पुढच्या वर्षापर्यंत भारताच्या अनेक भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त उष्ण आणि कोरडे हवामान पाहायला मिळू शकते, अशी भीती वैज्ञानिकांना आहे.

जलस्रोतांवरील ताण वाढल्याने केवळ कृषी उत्पादनावर परिणाम होणार नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही ताण येऊ शकतो.

शहरांमध्येही उष्णतेचा प्रभाव वाढू शकतो. दीर्घकाळ टिकणारी तीव्र उष्णता लोकांच्या आरोग्यासाठी आणि शहरांमधील झाडे व वनस्पतींसाठी आव्हान बनू शकते.

हवामानातील अचानक बदलामुळे प्राण्यांचे अन्न, प्रजनन चक्र आणि त्यांच्या राहण्याच्या जागेवरही परिणाम होऊ शकतो. यामुळे जंगलांमधील विविध प्रजातींमधील समतोल बिघडण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम संपूर्ण अन्नसाखळीवर होऊ शकतो.

एल-निनोचा प्रभाव केवळ जमिनीपुरता मर्यादित राहणार नाही. हिंदुस्थानच्या आसपासच्या सागरी क्षेत्रात समुद्राचे तापमान वाढल्याने सागरी उष्णतेची लाट येऊ शकते.  याचा परिणाम सागरी जीवांवर होऊ शकतो.