दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्या! हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडय़ातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदील झाला असून त्यांना सरकारने तातडीने हेक्टरी 1 लाख रुपये मदत आणि सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली. दुष्काळामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आपल्या शेतीची काय अवस्था झाली आहे ते पाहायला यावे अशी विनंती करूनही कुणीच न फिरकल्याने बुलढाण्यातील एका शेतकऱ्याला आपले 20 एकर सोयाबीन मोडीत काढावे लागले असे सपकाळ यांना दिसून आले. त्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी सरकारकडे आशेने पाहतोय, पण सरकारला त्याचे काहीच पडलेले नाही. दुष्काळ हा राजकारणाचा विषय नाही, पण सरकारनेही शेतकऱ्यांच्या हाकेला सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे असे ते म्हणाले.

महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी आहे. बुलढाणा जिह्यातील या गावात कर्जमाफीच्या पहिल्या यादीत दोन शेतकऱ्याची नावे होती, तर दुसऱ्या यादीत एका शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याला फक्त 40 हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे, असे सपकाळ म्हणाले.