
अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत तातडीने द्या, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी येत्या 28 सप्टेंबर रोजी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यावर आक्रोश मोर्चा काढण्याची घोषणा आज शिवसेनेने केली.
शिवसेना उपनेते-आमदार नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज अमरावती विश्रामगृह येथे जिह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात शिवसेना आमदार गजानन लवटे, उपनेते सुधीर सूर्यवंशी, माजी खासदार अनंतराव गुढे, जिल्हाप्रमुख पराग गुडधे, मनोज कडू, प्रा. प्रफुल भोजने, जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप बाजड आदी उपस्थित होते. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा आक्रोश मोर्चा सकाळी 10 वाजता काढणार आहे. दुष्काळग्रस्त मेळघाटाकरिता विशेष पॅकेज जाहीर करावे, स्मार्ट मीटर काढून जुने वीज मीटर पुन्हा बसवण्यात यावेत, अशाही शिवसेनेच्या मागण्या आहेत.



























































