मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याचा वाद; मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले, पण कार्यवाही ढिम्म

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पाठयपुस्तकातून मराठा साम्राज्याचा गौरवशाली विस्तार दर्शवणारा नकाशा हटवल्यानंतर मोठा वाद उफाळून आला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन नकाशा पुन्हा समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यावर कार्यवाही ढिम्म असल्याने इतिहासप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन महाराष्ट्रात सत्ता मिळवली जाते, त्याच छत्रपतींचा आणि मराठा साम्राज्याचा इतिहास पुसला जात असताना महाराष्ट्राचे नेतृत्व एवढे निष्क्रिय का? असा सवाल इतिहासप्रेमी ऋषिकेश निकम यांनी केला आहे. एनसीईआरटीकडून नकाशा हटवल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊ आणि हा नकाशा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करू’ असे दोन-दोन वेळा जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात नकाशा परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून एकही ठोस हालचाल झालेली नाही. जर राजस्थानचे नेते आपल्या भूमिकेसाठी दिल्लीत जाऊन दबाव आणू शकतात, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या मराठा साम्राज्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासाठी एवढे आळशी आणि उदास का, असाही प्रश्न त्यांनी केला आहे.

नकाशा तातडीने पुन्हा समाविष्ट करा

केंद्र सरकारने आणि एनसीईआरटीने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता छत्रपती शिवाजी महाराजांचा दक्षिण दिग्विजय नकाशा आणि ‘अटक ते कटक’ मराठा साम्राज्याचा संपूर्ण नकाशा पाठय़पुस्तकात तातडीने पुनश्च समाविष्ट केलाच पाहिजे, अशी आग्रही मागणी ऋषिकेश निकम यांनी केली आहे.