
बोलिवियाच्या दाट जंगलांमध्ये लपून राहिलेल्या एका छोट्याशा रानटी मांजरीला पाहायला मोठी गर्दी होत आहे. ही एक नवीन प्रजातीची मांजर असल्याचे प्राणी शास्त्रज्ञांनी स्पष्ट केल्यानंतर पर्यटकांचे लक्ष या मांजरीकडे लागले असून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होत आहे. या मांजरीला तिग्रीनो असे नाव देण्यात आले आहे. या मांजरीला मात्र ही गर्दी आवडत नाही असे वाटते असे वृत्तसंस्थेच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
बिबट्यासारखे ठिपके असलेली ही लहान मांजर पटकन घाबरते; म्हणूनच ला पाझ जवळील वन्यजीव अभयारण्यात तिला ठेवण्यात आले असून लोकांच्या गर्दी पासून दूर ठेवतात. रविवारी ‘द असोसिएटेड प्रेस’ने भेट दिली तेव्हा, तिग्रीनो आपल्या घरातून बाहेर आली काही मिनिटे इकडे तिकडे फेऱ्या मारून पुन्हा झाडीत लपून बसली.
तिग्रीनो ही ‘लिओपार्डस टिल्कायो’ (Leopardus tilcayo) या प्रजातीशी संबंधित आहे, जी गेल्या एका शतकाहून अधिक काळानंतर शास्त्रज्ञांनी शोधून काढलेली पहिलीच जिवंत रानटी मांजर प्रजाती आहे. डोक्यापासून शेपटाच्या मुळापर्यंत अवघ्या १८ इंच (४६ सेंटीमीटर) लांबीची आणि ३ पौंड (१.४ किलोग्राम) वजनाची ही मांजर सरासरी पाळीव मांजरीपेक्षाही लहान आहे.
गुरुवारी ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या शोधामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. बोलिवियाभरातून आणि बाहेरूनही पर्यटक ‘सेंडा वेर्डे वन्यजीव अभयारण्यात’ गर्दी करत आहेत, जिथे तिग्रीनो २०१७ पासून राहत आहे. एका कुटुंबाने तिला पाळीव मांजर बनवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते अयशस्वी ठरले. यानंतर ती या अभयारण्यात आणली होती.
अभयारण्याचे सह-संस्थापक मार्सेलो लेवी म्हणाले, ‘अवघ्या काही दिवसांतच तिग्रीनो संवर्धनाचा ब्रँड अॅम्बेसिडर बनली आहे’. ते पुढे म्हणाले की, नवीन प्रजाती म्हणून मिळालेल्या या मान्यतेमुळे बोलिवियाच्या उष्णकटिबंधीय जंगलांमधील रानटी मांजरी आणि त्यांच्या अधिवासाचे रक्षण करण्याच्या गरजेबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.
लेवी म्हणाले, ‘ती अतिशय छोटी असली तरीही ती इतकी महत्त्वाची बनली आहे.’




























































