
कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना सध्या अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाहतूककोंडी, रस्त्यावरील खड्डे, पाणीटंचाई, वाढती गुन्हेगारी, रेल्वेतील जीवघेणी गर्दी यामुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. कल्याण, भिवंडीकरांच्या या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन छेडणार असल्याची घोषणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लोकसभा संपर्कप्रमुख, आमदार वरुण सरदेसाई यांनी आज केली.
कल्याण लोकसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर आज वरुण सरदेसाई यांनी सर्वेश सभागृहात कल्याण व भिवंडीतील प्रमुखा पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सरकारला जागे करण्याचे काम विरोधी पक्षाचे असते. विरोधी नेता म्हणजे जनतेचा आवाज असून सरकारला जनतेच्या प्रश्नांची जाणीव करून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ती चोखपणे बजावणार असून कल्याण, भिवंडीतील जिव्हाळ्याच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सरदेसाई यांनी दिली.
या बैठकीत वरुण सरदेसाई यांनी पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच नागरिकांच्या प्रश्नांचीदेखील माहिती करून घेतली. स्मार्ट मीटरसंदर्भातील अडचणी, रखखडलेले उड्डाणपूल, डंपिंग ग्राऊंड, शाळांच्या समस्या अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी असंख्य तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला.



























































