
कराड तालुक्यातील हेळगाव येथे रस्त्याच्या वादातून आज सकाळी दोन गटांत झालेल्या हाणामारीत अनेकजण जखमी झाले. यात गंभीर जखमी झालेल्या सूरज भरत सूर्यवंशी (वय 28) याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी महिलांसह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर हेळगावमध्ये तणावपूर्ण वातावरण असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
आज सकाळी हेळगाव येथील प्रज्वल किसन सूर्यवंशी यांच्या घरासमोर रस्त्याच्या वादातून हाणामारी झाली. प्रज्वल सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून मसूर ठाण्यात श्रीमंत ऊर्फ उत्तम रामचंद्र सूर्यवंशी, आयुष सचिन ऊर्फ विठ्ठल सूर्यवंशी, ओंकार उत्तम सूर्यवंशी, सचिन ऊर्फ विठ्ठल रामचंद्र सूर्यवंशी, रामचंद्र महादेव सूर्यवंशी, रेश्मा सचिन ऊर्फ विठ्ठल सूर्यवंशी, सुनीता उत्तम सूर्यवंशी, तेजस्विनी संजय सूर्यवंशी, शालन रामचंद्र सूर्यवंशी आणि विद्या ओंकार सूर्यवंशी (सर्व रा. हेळगाव, ता. कराड, जि. सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीमंत सूर्यवंशी, आयुष सूर्यवंशी, ओंकार सूर्यवंशी, सचिन सूर्यवंशी आणि रामचंद्र सूर्यवंशी यांनी सशस्त्र्ा मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. यावेळी घराशेजारील बाथरूममधून घरात येणाऱया सूरज भरत सूर्यवंशी याच्यावर हल्ला करण्यात आला.
दुसऱया गटातील दोघे जखमी झाल्याची माहिती असून, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. याच कुटुंबात रस्त्याच्या कारणावरून जुना वाद होता. आज पुन्हा वाद उफाळून आल्याने त्याचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला.




























































