
तेजा रिओ दिग्दर्शित ‘Angh’ (अंग) या चित्रपटाने 2026 च्या टोरोंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधील (TIFF) ‘प्लॅटफॉर्म कॉम्पिटिशन’चा पुरस्कार पटकावला आहे. यंदा या स्पर्धेत निवड झालेला हा एकमेव हिंदुस्थानी चित्रपट होता. या पुरस्कारामुळे ‘अंग’ने आता 2027 च्या ऑस्करच्या शर्यतीत थेट प्रवेश केला आहे. यंदाच्या 99 व्या अकादमी पुरस्कारांसाठी इंटरनॅशनल फीचर फिल्म श्रेणीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. त्यानुसार, एखाद्या देशाच्या अधिकृत प्रवेशिकेसोबतच अकादमीने निश्चित केलेल्या पात्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधील विशिष्ट पुरस्कार जिंकणाऱ्या इंग्रजीतर भाषेतील चित्रपटांनाही या श्रेणीसाठी पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळेच आता ‘अंग’ चित्रपटाला हिंदुस्थानकडून अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवड होण्याची आवश्यकता नाही. TIFFमधील ‘प्लॅटफॉर्म अवॉर्ड’ जिंकल्यामुळे हा चित्रपट आता ऑस्करच्या इंटरनॅशनल फीचर फिल्म श्रेणीसाठी पात्र ठरला आहे. मात्र, ऑस्करसाठी पात्रता मिळणे आणि अंतिम नामांकन मिळणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ‘अंग’ला नामांकन मिळाले आहे, असे सध्या म्हणता येणार नाही, असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे.
दरम्यान, संतोष दावखर लिखित-दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘गोंधळ’ हा 99 व्या अकादमी पुरस्कारांसाठी हिंदुस्थानची अधिकृत प्रवेशिका आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 33 चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड केली आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानचे अधिकृत प्रतिनिधित्व करणारा ‘गोंधळ’ आणि नव्या नियमांनुसार पात्र ठरलेला ‘अंग’ असे दोन हिंदुस्थानी चित्रपट इंटरनॅशनल फीचर फिल्मच्या ऑस्कर शर्यतीत दिसणार आहेत.
‘अंग’ची कथा 1960 च्या दशकातील नागालँडच्या पार्श्वभूमीवर बेतलेली आहे. कोंयाक नागा समाजातील प्रमुख ‘अंगबा’ आणि त्याच्या मुलाभोवती चित्रपटाची कथा फिरते. आपला समुदाय आणि पारंपरिक जग बदलत असताना अंगबा पत्नी आणि मुलासोबत अस्तित्वाची झुंज देतो. रिओ यांच्या 2021 मध्ये प्रदर्शित झालेल्या याच नावाच्या लघुपटावर हा चित्रपट आधारित आहे.
‘अंग’मध्ये नागालँडमधील स्थानिक कलाकारांसोबत बाफ्टा पुरस्कार विजेते अभिनेते डग्लस हेन्शॉल यांनीही भूमिका साकारली आहे. TIFFच्या ‘प्लॅटफॉर्म’ ज्युरीने चित्रपटाच्या दृष्टीकोनाचे, चित्रपटनिर्मितीच्या सामर्थ्याचे आणि एका बदलत्या जगाचे केलेल्या संवेदनशील चित्रणाचे कौतुक केले.


























































