
फुटबॉलच्या मैदानावरून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. थाई लीग सामन्यापूर्वी सराव करत असताना इंग्लंडचा माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अँड्रोस टाऊनसेंड याच्या अंगावरून थेट ‘पिच रोलर’ फिरल्याची घटना घडली. सुदैवाने या विचित्र अपघातात तो थोडक्यात बचावला असून तो किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने या अपघातात त्याला गंभीर दुखापत झालेली नाही. या संपूर्ण घटनेचा थरारक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
Andros Townsend just got ran over by a pitch roller in the Thailand league… pic.twitter.com/TZgRGt9rWy
— The 44 ⚽️ (@The_Forty_Four) September 19, 2026
नेमकं काय घडलं?
३५ वर्षीय अँड्रोस टाऊनसेंड सध्या थायलंडच्या ‘थाई लीग १’ मधील ‘पीटी प्रचुआप’ संघाकडून खेळत आहे. पट्टानी संघाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो मैदानावर सराव करत होता. हवेत उडी मारून बॅकहील शॉट मारण्याचा प्रयत्न करत असताना तो थेट मैदानावरील पिच रोलरच्या समोर येऊन पडला. यावेळी चालकाचे लक्ष दुसरीकडे असल्याने रोलर टाऊनसेंडच्या पायावरून आणि कमरेच्या भागावरून पुढे निघून गेला. हा प्रसंग इतका धक्कादायक होता की मैदानावरील इतर खेळाडूंनी भीतीने डोक्यावर हात धरले, तर उपस्थितांच्या किंचाळ्या व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकू येत आहेत.
अपघातानंतरही मैदानात उतरला
एवढ्या भीषण अपघातानंतरही टाऊनसेंडला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. विशेष म्हणजे, त्याने याच सामन्यात काही वेळाने त्याने बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरून सहभाग घेतला. या सामन्यात त्याच्या संघाने ३-० असा दणदणीत विजय मिळवला.
खेळाडूने स्वतःच उडवली खिल्ली
इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाकडून १३ सामने खेळलेल्या आणि टोटेनहॅम तसेच क्रिस्टल पॅलेससारख्या नामांकित क्लबचे प्रतिनिधित्व केलेल्या टाऊनसेंडने या घटनेनंतर हलकेफुलके वातावरण निर्माण केले. त्याने स्वतःच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करत त्याला मिश्कील कॅप्शन दिली.


























































