
मुंबईतील जुहू परिसरामध्ये बहुसंख्य बॉलिवूड सेलिब्रिटींची आलिशान घरे आहेत. अभिनेत्री विद्या बालनचे जुहूतील समुद्रकिनारी असलेले घरही त्यापैकीच एक आहे. मात्र, हे घर केवळ आलिशान किंवा महागडे म्हणून खास नाही, तर त्याच्या इंटिरिअरमध्ये विद्याच्या दक्षिण भारतीय मुळांची सुंदर झलक पाहायला मिळते. पारंपरिक दक्षिण भारतीय शैली आणि आधुनिक सुखसोयी यांचा सुरेख मेळ या घराच्या सजावटीत साधण्यात आला आहे.
टाइम्स आॅफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार विद्या बालन आणि तिचे पती, निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर जुहू येथील ‘प्रणिता अपार्टमेंट्स’मध्ये असलेल्या या घरात राहतात. वृत्तांनुसार, या अपार्टमेंटसाठी या जोडप्याने 14 कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च केली आहे. विद्या बालनची मुळे केरळशी जोडलेली आहेत. त्यामुळे आपल्या घराच्या सजावटीतही तिने आपल्या संस्कृतीची झलक जपल्याचे दिसते. घरातील लाकडी फर्निचर, पारंपरिक शैलीतील व्हरांडे, रोपांची सजावट आणि मोठ्या खिडक्या यामुळे घराला एक वेगळाच क्लासिक लूक मिळाला आहे.
घराची रचना मोकळी आणि प्रशस्त ठेवण्यात आली आहे. विशेषतः लिव्हिंग रूममध्ये लाकडी फर्निचरचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. त्याला साजेसे कुशन आणि सजावटीच्या वस्तू घराच्या सौंदर्यात भर घालतात. घरातील मोठ्या खिडक्यांमधून नैसर्गिक प्रकाशाचा मुबलक वापर होतो. बाल्कनी आणि व्हरांड्यांमध्ये ठेवलेली हिरवीगार रोपे घराला अधिक प्रसन्न वातावरण देतात. घरातील जिनाही आकर्षणाचा भाग आहे. पारंपरिक वास्तुशैलीची आठवण करून देणारे हे घटक आधुनिक अपार्टमेंटला एक वेगळा लूक देतात.
घराच्या सजावटीत दक्षिण भारतीय शैलीचा प्रभाव असला तरी आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक असलेला आराम आणि मोकळेपणाही जपण्यात आला आहे. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा समतोल या घरात पाहायला मिळतो. विद्या बालनची मुळे केरळमधील पलक्कडशी जोडलेली आहेत. त्यामुळे विद्याच्या घराच्या सजावटीत दक्षिण भारतीय संस्कृतीची झलक दिसणे विशेष ठरते.
विद्या बालन सध्या ‘जेलर २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित या ॲक्शन-एंटरटेनरमध्ये ती सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. चित्रपटात विद्याच्या ‘कांता’ या पात्राची पहिली झलकही निर्मात्यांनी प्रेक्षकांसमोर आणली आहे.


























































