
बिहारमधील जमुई शहरात एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोचिंग क्लासवरून परतणाऱ्या एका अल्पवयीन मुला-मुलीला रस्त्यात अडवून काही तरुणांच्या टोळक्याने शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ स्वतः आरोपींनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला असून, या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक शाळेत दहावीत शिकणारे हे दोघे शनिवारी संध्याकाळी शहरातील प्रसिद्ध ‘माडवा पहाड’ परिसरात गेले होते. तिथून परतत असताना तरुणांच्या एका टोळक्याने त्यांना पाहिले आणि त्यांची स्कूटर जबरदस्तीने थांबवली. आरोपींनी दोघांना शिवीगाळ करत खाली उतरवले आणि मारहाण सुरू केली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक आरोपी मुलाची कॉलर पकडून त्याला ओढताना दिसत आहे. मुलाने तरुणीच्या मदतीने स्वतःची सुटका करून पळण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने त्यांचा पाठलाग केला. पाठलागादरम्यान एका नराधमाने मुलीची मान पकडून तिला उचलले आणि तिचा विनयभंग केला. मुलगा धावत जाऊन मध्ये पडल्याने मुलीची सुटका झाली.
दोघांनी पुन्हा स्कूटरवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, एका आरोपीने मागे बसलेल्या मुलीचा हात धरून तिला खेचण्याचा प्रयत्न केला. टोळक्याने त्या दोघांना जबरदस्तीने माफी मागायला लावली. “आम्हाला जाऊ द्या, आम्ही पुन्हा कधीच इथे येणार नाही,” अशी गयावया मुलगी करताना व्हिडिओत ऐकू येत आहे. बऱ्याच त्रासानंतर शेवटी त्या टोळक्याने त्यांना तिथून जाऊ दिले.
पोलिसांकडून गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू
हा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची पुष्टी करत गुन्हा (FIR) नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले. पोलिसांनी दोन्ही पीडितांशी संवाद साधून त्यांचे जबाब नोंदवले आहेत. व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.


























































