
बिहारच्या जमुईमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीची छेडछाड केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. सोमवारी (21 सप्टेंबर) राहुल गांधी यांनी हा व्हिडीओ ‘अस्वस्थ करणारा’ असल्याचे म्हणत बिहार सरकारकडे या घटनेबाबत उत्तर मागितले. तसेच, कोणाचेही नाव न घेता त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.
राहुल गांधी यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, बिहारच्या जमुईमधील एक व्हिडीओ अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. दहावीतील एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला रस्त्यात जबरदस्तीने अडवण्यात आले. त्यांचा छळ करण्यात आला, अपमान करण्यात आला आणि विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आला. मुलगी हात जोडून तिला सोडून देण्याची विनंती करत होती. मात्र, काही तरुण तिच्याशी गैरवर्तन करत तिला खेचत होते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
‘या लोकांना अशी गैरवर्तणूक करण्याचा अधिकार कोणी दिला?’ असा सवाल राहुल गांधी यांनी केला. ही संस्कृती नसून पुरुषप्रधान मानसिकता असल्याचे त्यांनी म्हटले. कोणत्याही पुरुषाला मुलीच्या शरीरावर, तिच्या येण्या-जाण्यावर आणि तिच्या आवडी-निवडीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार असल्याची मानसिकता म्हणजे पुरुषप्रधानता असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
‘अंधभक्त’ अशा विचारांना सामान्य ठरवतात, असा आरोपही त्यांनी केला. “जेव्हा नियंत्रण ठेवण्याच्या या मानसिकतेलाच संस्कृतीचे नाव दिले जाते आणि ‘अंधभक्त’ अशा विचारांना योग्य ठरवतात, तेव्हा जमावालाच आपण कायद्यापेक्षा मोठे असल्यासारखे वाटू लागते.”
व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवली पाहिजे आणि संबंधित आरोपींवर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. तसेच, ही घटना 19 सप्टेंबरची असेल तर आरोपी अद्याप तुरुंगात का नाहीत, असा सवालही त्यांनी केला.
‘संध्याकाळी 7 वाजता बिहारच्या रस्त्यांवर एखादी मुलगी सुरक्षित का नाही?’ असा सवाल करत राहुल गांधी यांनी बिहार सरकारकडे या घटनेबाबत उत्तर मागितले.
The video from Jamui, Bihar is deeply disturbing.
Two Class 10 students were stopped on a road. Harassed. Humiliated. Molested. A young girl, hands folded, begged to be let go while goons groped her and dragged her away.
Who gave these men the right to behave like this? This is…
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 21, 2026




























































