हिंदुस्थान-जपान ऐतिहासिक सामन्यावर डुजुआन वादळाचे संकट; चाहत्यांची धाकधूक वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि जपान या संघांमध्ये पहिल्यांदाच 22 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक टी-20 सामना खेळवला जाणार आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील चाहते हा ऐतिहासिक सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, या सामन्यावर आता शक्तिशाली ‘डुजुआन’ वादळाचं मोठं संकट ओढवलं आहे. याचा परिणाम टीम इंडियाच्या सराव सत्रावरही झाला असून मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे टीम इंडियाला सराव सत्र रद्द कारवं लागलं आहे.

जपान हवामान विभाग आणि एक्यूवेदरच्या अहवालानुसार, 22 सप्टेंबर रोजी सानो शहरात 83 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. या आधीच पूर्व जपान आणि कांटो क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, खराब हवामानाचा फटका एशियन गेम्सच्या तयारीलाही बसला आहे. आज होणारे (21 सप्टेंबर 2026) घोडेस्वारीचे सामने स्थगित करण्यात आले असून, जपानमध्ये शेकडो उड्डाणे आणि वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी हा सामना एशियन गेम्सपूर्वीचा अखेरचा सराव सामना असणार आहे. 28 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या एशियन गेम्समध्ये टीम इंडिया क्वार्टर फायनलपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. गतविजेता आणि सध्याचा टी-20 वर्ल्ड चॅम्पियन असलेला हिंदुस्थान आणि चाहत्यांचे लक्ष आता पूर्णपणे हवामानावर आणि सामन्याच्या भवितव्यावर लागले आहे. हिंदुस्थआन-जापान राजनैतिक संबंधांच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘सुजुकी कप’ नावाने होणारी ही दोन्ही देशांमधील पहिलीच मेन्स आंतरराष्ट्रीय टी-२० लढत आहे, जी सानो इंटरनॅशनल क्रिकेट ग्राउंडवर खेळवली जाणार आहे.