वैद्यकीय विश्वात नवी क्रांती! मानवी शरीरात सापडला आणखी एक ब्लडग्रुप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मानवी शरीरात A, B, AB किंवा O असे एकूण चार प्रकारचे रक्तगट आहेत. यासंदर्भातील अभ्यास आपण शालेय शिक्षणापासूनच करत आलेलो आहोत. मात्र, आता वैद्यकिय विश्वातून एक अशी बातमी समोर येतेय जी ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. या शोधाने मानवी शरीररचना आणि रक्त प्रणालिच्या इतिहासात एक नवा अध्याय जोडला आहे. मानवी शरीरात संशोधकांनी एका अगदी नव्या रक्तगट प्रणालीचा शोध लावला आहे, ज्याला ‘जामा’ (JAMA) असे नाव देण्यात आले आहे.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजनने (ISBT) या नव्या प्रणालीला अधिकृतपणे मानवातील 49 वी रक्तगट प्रणाली म्हणून मान्यता दिली आहे. संशोधनानुसार, आपल्या शरीरात F11R नावाचे जनुक (Gene) असते, ज्याच्या माध्यमातून ‘जामा’ प्रोटीनची निर्मिती होते. परंतु, या दुर्मिळ रक्तगट असलेल्या व्यक्तींच्या शरीरात या जनुकामध्ये आणि प्रथिनामध्ये काही विशिष्ट अनुवांशिक बदल (Genetic Mutations) झाले होते. परिणामी, अशा व्यक्तींच्या रक्तात सामान्य लोकांप्रमाणे आढळणारे काही ठराविक अँटीजन अनुपस्थित असतात.

या ब्लडग्रुपचा शोध कसा लागला-
या महत्त्वपूर्ण शोधाची सुरुवात एका इस्रायली महिला आणि तिच्या भावाच्या वैद्यकीय तपासणीतून झाली. वैज्ञानिकांनी जेव्हा या बहीण-भावाच्या रक्ताच्या नमुन्यांचे विश्लेषण केले, तेव्हा त्यांना त्यात काही अत्यंत दुर्मिळ अँटीबॉडीज मिळाल्या. या प्रकरणाच्या सखोल अभ्यासानंतर ही केस प्रचलित रक्तगटांपेक्षा पूर्णपणे भिन्न असल्याचे स्पष्ट झाले.

वैज्ञानिकांनी लावलेला हा सोध फार महत्त्वाचा मानला जात आहे. अशा दुर्मिळ रक्तगट असलेल्या रुग्णाला जर सामान्य रक्त चढवले गेले, तर मानवी शरीर त्याला नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकते, जी काही वेळा जीवघेणी ठरू शकते. आता या नव्या संशोधनामुळे आणि आधुनिक डीएनए चाचण्यांच्या साहाय्याने डॉक्टर रुग्ण किंवा रक्तदात्याचा रक्तगट अगदी अचूकपणे आधीच ओळखू शकतील. यामुळे रक्तदानादरम्यान किंवा ट्रान्सफ्यूजनच्या वेळी होणाऱ्या वैद्यकीय चुका टाळता येतील आणि भविष्यात दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना योग्य रक्ताची जुळवाजुळव करणे अधिक सोपे होऊन वैद्यकीय उपचारांचा दर्जा आणखी उंचावेल.